मालेगाव, (प्रतिनिधी) ३ जानेवारी - प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात प्रारंभ झाला.
यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी श्री खंडेराव महाराज मंदिरात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सपत्निक विधिवत महापूजा केली. या महापूजेमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला.
राज्यभरातील मल्हार भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेस प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. शुक्रवारी जेजुरी येथून पायी मशाल ज्योत मल्हार भक्तांच्या वतीने चंदनपुरी नगरीत दाखल झाली. तसेच आज सकाळी ज्योतीसह खंडोबा म्हाळसाआई व बनाईमातेच्या मुखवट्यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
यात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडत असून, संपूर्ण चंदनपुरी नगरी “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या जयघोषाने दुमदुमून गेली.
या प्रसंगी गावचे सरपंच, मल्हार भक्त, भाविक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.