- रोहन देशपांडे
आंदोलक
‘तपोवन वाचवा – नाशिक वाचवा’
तपोवन वाचविण्यासाठी आमची तरुण पिढी मागील ४६ दिवसांपासून सतत आंदोलन करत उभी आहे. पण प्रशासन आणि सरकार या दोघांच्याही भूमिकेमध्ये नाशिककरांविषयी कोणतीही संवेदना किंवा जबाबदारी जाणवत नाही ही वस्तुस्थिती आज स्पष्टपणे दिसत आहे. जर सरकारला खरोखर तपोवनाबाबत कळकळ असती, तर आतापर्यंत चर्चा करून समाधानकारक मार्ग नक्कीच निघाला असता. परंतु येथे तर तपोवनातील झाडे कोणत्याही परिस्थितीत कापण्याचा हट्ट अधिक दिसून येतो.
महाराष्ट्रातील नागरिकांच्या मोबाईल संदेशांना उत्तर देणारे देवाभाऊ
मुख्यमंत्री देवेंद्फर डणवीस आपण संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख पाहिली, तेच साहेब तपोवनाच्या संवर्धनाबाबत एक शब्दही बोलत नाहीत.
हा मौन म्हणजे बेगडीपणा नव्हे तर काय? प्रभू श्रीरामाच्या नावाने मतं मागणारे नेते, त्या रामनामाच्या पवित्र भूमीत असलेल्या तपोवनातील हजारो झाडांच्या विनाशाकडे डोळेझाक कशी करू शकतात? आणि ज्यांना हा निर्णय सुचतो, त्यांच्या बाजूने आपण मौन धरणे हे नाशिककरांना स्वीकारार्ह नाही.
नाशिक महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आणि मग त्या सत्तेच्या जोरावर तपोवनातील झाडे कापायची—हा जर कुणाचा मनसुबा असेल, तर नाशिककर अजिबातच भुलणार नाहीत. नाशिककरांचे एकच स्पष्ट मागणे आहे: प्रथम तपोवन संवर्धनाची बांधिलकी जाहीर करा, मगच आम्ही तुम्हाला विचार करू.
त्याशिवाय कोणत्याही सत्ताधाऱ्यावर विश्वास ठेवणे नाशिककरांना अयोग्य वाटते. विरोधी पक्षांनी येऊन त्यांच्या भूमिका मांडल्या. पण सरकारविरोधात मुद्दा आहे म्हणून ते बोलतात अशी मानसिकता ही केवळ संकुचित विचारसरणी आहे.
मा. अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राममंदिरासाठी घेतलेली ठाम भूमिका स्मरणात ठेवा. आजच्या परिस्थितीत तपोवनाबाबतचे मौन नाशिककरांच्या मनाला वेदना देणारे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची क्षमता आणि ताकद आम्हाला ठाऊक आहे. त्यांच्या एका निर्णयाने हा प्रश्न सुटू शकतो. पण ते मौन का धारण करत आहेत याचे उत्तर "देवच" देऊ शकेल.
पालकमंत्री गिरीश महाजन तपोवनासंबंधीच्या प्रश्नावर म्हणाले— "कुंभमेळा मग कुठे करायचा?"
नाशिककरांचे त्यांना सोपे आव्हान आहे: आमच्या आंदोलनकर्त्यांना एक दिवस मुख्यमंत्री बनवून दाखवा; आम्ही तुम्हाला तपोवनाचे संपूर्ण पर्यायी नियोजन तयार करून देऊ. आहे का हिंमत?
सरकारच्या सोयी-सुविधा, पदसत्ता, प्रोटोकॉल यांनी वेढलेले लोक, जनतेच्या भल्यासाठी मात्र काडीचीही संवेदना दाखवत नाहीत—हे पाहून नाशिककरांना खरोखरच लाज वाटते. आणि म्हणूनच सत्तेच्या चाव्या पुन्हा त्याच हातात दिल्या तर तपोवन संपेल. नाशिककर हे पाप होऊ देणार नाहीत.
“जो राम का नहीं — वो किसी काम का नहीं.”
नाशिकचा महापौर नाशिककरच ठरवणार!