पुणे, (प्रतिनिधी) ३ जानेवारी - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या (एमसीए इन्विटेशन सुपर लीग ), दोन दिवसीय कसोटीत नाशिकने सांगलीवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मध्यमगती गोलंदाज व्यंकटेश बेहरे व सायुज्य चव्हाण हे विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले.
नाशिकने नाणेफेक जिंकून सांगलीला प्रथम फलंदाजी देत व्यंकटेश बेहरेच्या ५ व सायुज्य चव्हाणच्या ४ बळींच्या जोरावर २७.४ षटकांत ९५ धावांत रोखले. ज्ञानदीप गवळी व देवाशिष गायकवाड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. नाशिकने ऋग्वेद जाधव २४ , विदुर मौले २३, अक्षत भांडारकर २२ व वेद सोनवणेच्या २१ धावांच्या जोरावर ५९.५ षटकांत १५३ धावा करत पहिल्या डावात ५८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
सांगलीने दुसऱ्या डावात आक्रमक खेळत ३० षटकात १४१ धावा केल्या. व्यंकटेश बेहरेने पुन्हा ४ तर ज्ञानदीप गवळीने ३ व सायुज्य चव्हाण, अथर्व सूर्यवंशी आणि देवाशिष गायकवाड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. विजयासाठीचे ८४ धावांचे लक्ष्य नाशिकने १९.५ षटकांत आठ गडी राखून दुसऱ्या दिवशीच्या चहापानापूर्वीच सहज पार केले. दुसऱ्या डावात वेद सोनवणेने फटकेबाज नाबाद २४ तर चिन्मय भास्करने २० आणि ध्रुव एखंडेने १७ धावा करत नाशिकला मोठा विजय मिळवून दिला. संघाला प्रशिक्षक संजय मराठे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी संघाचे अभिनंदन करून यापुढील बाकी दोन सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.