नाशिक, (प्रतिनिधी) ३ जानेवारी - शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी गुरुवारी (दि.१) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. तिघांच्या आत्महत्येच कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
मखमलाबाद रोडवरील हर्शल गणेश भावसार (३१ रा.दिपाली अपा.मधुबन कॉलनी) या युवकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत कुटुंबीयांनी त्यास तात्काळ नजीकच्या साई समर्थ हॉस्पिटल मार्फत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.
दुसरी घटना उपनगर भागात घडली. तन्वी दिलीप दमेर (३२ रा. ओमदिव्य अपा. शांतीपार्क) या महिलेने अज्ञात कारणातून गुरुवारी दुपारच्या सुमारास आपल्या घरातील किचनमध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबीयांनी तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोत घडली. विकास दिलीप वारे (४२ रा. साईग्राम रो हाऊस उपेंद्रनगर) यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बनतोडे करत आहेत.
जुन्या वादातून चौघांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण
नाशिक - जुन्या वादाची कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना प्रबुध्दनगर भागात घडली. या घटनेत सदर व्यक्तीच्या डोक्यात काही तरी हत्यार मारण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुश अशोक पटेकर, भैय्या अशोक पटेकर, पुष्पराज घुगे व संकेत गांगुर्डे अशी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अमोल बबन सदर (३३ रा.आंबेडकर चौक, प्रबुध्दनगर) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. अमोल सदर हा बुधवारी (दि.३१) रात्री आपल्या घर परिसरातील आंबेडकर चौकातून जात असतांना संशयित टोळक्याने त्यास गाठले. यावेळी जुन्या वादाची कुरापत काढून संतप्त टोळक्याने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत टोळक्यातील एकाने अमोल सदर याच्या डोक्यात काही तरी हत्याराने प्रहार केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक न्याहळदे करीत आहेत.