नववर्षानिमित्त भारतीय रेल्वेची राष्ट्राला भेट.... पहिली स्लीपर कोच वंदे भारत रेल्वे या मार्गावर धावणार...

Share:
Main Image
Last updated: 03-Jan-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २ जानेवारी - केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथील रेल भवनमध्ये झालेल्या बैठकीत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यासोबतच आसाममधील गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली. 

वंदे भारत शयनयान गाडीची सराव चाचणी, परीक्षण आणि प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सांगितल्याप्रमाणे या मार्गावर पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे धावणार आहे.  ही प्रगती भारतीय रेल्वे, देश आणि रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2026 हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी मोठ्या सुधारणांचे वर्ष असेल, ज्यात प्रवासी-केंद्रित अनेक उपक्रम सुरू केले जाणार आहेत, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, ज्यात 11 थ्री- टियर  वातानुकूलित डबे, 4 टू- टियर वातानुकूलित डबे आणि 1 फर्स्ट-क्लास वातानुकूलित डबा यांचा समावेश असेल, आणि या गाडीची एकूण प्रवासी क्षमता सुमारे 823 असेल.

या गाडीसाठी नवीन सस्पेंशनसह संपूर्णपणे नवीन रचना असलेली बोगी विकसित करण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले. बोगीच्या रचनेत अनेक नवीन सुधारणा करण्यात आल्या असून तिच्या अंतर्गत रचनेत आणि पायऱ्यांमध्ये एर्गोनॉमिक डिझाइनचा समावेश आहे, तसेच सुरक्षितता आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्वत्र विशेष निकष अंमलात आणलेले आहेत.

वंदे भारत शयनयान गाडी एक आरामदायी, सुरक्षित आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देईल.

वंदे भारत शयनयान गाडीमधील प्रवाशांना प्रवासादरम्यान त्यांच्या प्रादेशिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. गुवाहाटीहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये अस्सल आसामी पदार्थ मिळतील, तर कोलकाताहून सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये पारंपरिक बंगाली पदार्थांची चव घेता येईल, ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये एक आनंददायक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भोजनाचा अनुभव मिळेल.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये:

180  किमी प्रतितास पर्यंत डिझाइन गती असलेली अर्ध-उच्च-गती ट्रेन
सुधारित कुशनिंगसह एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले बर्थ
सहज हालचालीसाठी वेस्टिब्यूलसह स्वयंचलित दरवाजे
उत्कृष्ट सस्पेंशन आणि आवाज कमी करण्याच्या तंत्रज्ञानामुळे अधिक आरामदायी प्रवास
कवच (KAVACH) सह सुसज्ज
उच्च स्वच्छता राखण्यासाठी निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान
प्रगत नियंत्रणे आणि सुरक्षा प्रणाली असलेली चालक केबिन
वायुगतिकीय बाह्य स्वरूप आणि स्वयंचलित बाह्य प्रवासी दरवाजे
दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था
आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट यांच्यात संवादासाठी आपत्कालीन टॉक-बॅक युनिट
सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
सुधारित अग्निसुरक्षा: इलेक्ट्रिकल कॅबिनेट आणि शौचालयांमध्ये एरोसोल-आधारित आग शोध आणि नियंत्रण प्रणाली

 

 

Comments

No comments yet.