मुंबई, (प्रतिनिधी) २ जानेवारी - झारखंडमध्ये एक जागा असताना मुख्यमंत्री होऊ शकतो तर ३० जागांवरही राष्ट्रवादीचा मुंबईत महापौर होऊ शकतो असा ठाम दावा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
साडे तीन वर्षांनंतर नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार असल्याने नवाब मलिक माध्यमांशी काय बोलणार आणि काय बॉम्ब फोडणार याची उत्सुकता माध्यमकर्मींसह राज्यातील राजकीय लोकांचे लक्ष लागले होते आणि अपेक्षेप्रमाणे नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार हे बोलून आज खळबळ उडवून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची गरज असो नसो राष्ट्रवादीची ताकद मुंबईत किती आहे हे १६ जानेवारीला समजेल असे स्पष्ट संकेतही नवाब मलिक यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ९४ जागांवर उमेदवार उभे केले असल्याचे सांगताना ९५ व्या जागेवरही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता पण तो किरकोळ कारणावरून रद्द करण्यात आला आहे. तर दोन ठिकाणी पुरस्कृत उमेदवार केलेले आहेत. त्यामध्ये धारावी आणि रमाबाई आंबेडकरनगर - कामराजनगरचा समावेश असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
संपूर्ण मुंबईमध्ये जिथे - जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने लढू शकतो तिथे उमेदवार देण्यात आले आहे. आमच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या जास्त असून उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनिअर, भाजी विक्रेते, सफाई कामगार, आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषिक किंवा या राज्यातील भूमीपूत्र जे मुंबईला कर्मभूमी समजतात त्यांना संधी दिलेली आहे. सर्वधर्मीय लोकांना शिवाय मुस्लिम घटक, ख्रिश्चन, या घटकातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. बरेच लोक उत्तर भारतीयांना आपली स्वत:ची मते समजतात. त्यांची भावना झालीय की, आमच्यावर अन्याय होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुंबईत सर्वाधिक उमेदवारी उत्तर भारतीयांना दिली आहे. त्यामध्ये एकाच विशेष वर्गाला दिली आहे असे नाही तर विविध जातीतील उत्तर भारतीय लोकांना त्यामध्ये दक्षिण भारतीय, तेलगू भाषिक, अशा पध्दतीची यादी असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
या मुंबईमध्ये २००२ पासून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस असताना निवडणूक लढवत होतो त्यावेळी १४ जांगाच्यावर जाऊ शकत नाही असा एक आभास निर्माण करण्यात आला. मात्र यावेळी एक वेगळे चित्र मुंबईत राहणार आहे. या निवडणुकीत आमच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
निवडणूक व्यवस्थापन समितीने संपूर्ण चर्चा करुन ९४ उमेदवार निवडले आहेत. आम्हाला खात्री आहे की, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मुंबईत दिसेल. काही लोकं माझ्या नावाने बोंबाबोंब करत होते नवाब मलिक असतील तर आम्ही युती करणार नाही. मात्र आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी युतीची गरज नाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू ही भूमिका घेतली त्याबद्दल अजितदादा पवार यांचे नवाब मलिक यांनी विशेष आभार मानले.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ज्या पद्धतीने वागत आहेत. नियम कायदे बाजूला ठेवून पाहिजे ती उमेदवारी रद्द करायची. जे अपात्र आहेत त्यांची उमेदवारी रात्री साडेदहा वाजता पात्र आहेत असे जाहीर करायचे. निर्णय देत असताना निवडणूक निर्णय अधिकारी जी नियमावली, जे कायदे करण्यात आले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हे त्यांचे कर्तव्य असताना तिकडे दुर्लक्ष करत आहेत. एक उमेदवार हायकोर्टात गेला आहे. एका उमेदवाराच्याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी रात्री साडेदहा वाजता निर्णय घेत आहेत. त्या उमेदवाराने बेकायदेशीर बांधकाम केले आहे त्याचे पुरावे सादर केले आहेत. तरी त्याचा अर्ज बाद करत नाहीत. इथे कायद्याचे उल्लंघन करण्यात आलेले आहे.
१५१ नंबर वार्डमध्ये वंदना साबळे निवडणूक लढवत आहेत. तिथे राखीव जागेवर भाजपच्या माध्यमातून उमेदवार देण्यात आला आहे. त्या उमेदवाराकडे जातीचा दाखला नसताना त्याचा अर्ज दाखल करुन घेण्यात आला. छाननीमध्ये आमच्या उमेदवाराने जातीचा दाखला नाही अशी हरकत घेतली. त्याने दाखला सादर केला तो महाराष्ट्रातील नसून राजस्थानचा आहे. असे असताना अर्ज दाखल करुन घेतला हेच बेकायदेशीर आहे. रात्री साडे आठ वाजता त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यामूळे हा अर्ज वैध असे निवडणूक निर्णय अधिकारी सांगत आहेत. आमच्या उमेदवार मनिषा रहाटे (११९)जिथे निवडणूक लढवत आहेत तिथे शिंदे सेनेचा उमेदवार आहे तो महानगरपालिकेचा वेंडर (विक्रेता) आहे. नियमात महानगरपालिकेचा वेंडर असेल तर निवडणूक लढवू शकत नाही. याबाबत पुरावे सादर करण्यात आले. चार दिवसांपूर्वी पेमेंट त्याच्या खात्यात जमा झाले आहेत. पण त्यालाही संरक्षण देण्यात आले आहे.
ही लोकशाही आहे. लोकशाहीत जे कायदे निर्माण करण्यात आले आहे. जी नियमावली घालण्यात आली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. या तीन वार्डाबाबत कोर्टात जाऊ याला वेळ लागणार आहे परंतु राजस्थानमधील एखादा मुंबईत अर्ज भरून उमेदवारी लढत असेल तर मुंबईतील महाराष्ट्रातील मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे. देशभरातील मागासवर्गीय मुंबईत येऊन जागा भरुन टाकतील. ओबीसीबाबतही असे घडेल अशी शंकाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली.
याप्रकरणी कोर्टात गेल्यावर अधिकार्यांच्या नोकर्या जाणार आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देणार आहे. मुंबईत अशाप्रकारे घडत आहे.आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. आम्ही जे पत्र देणार आहे त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
निवडणूक आयोगावर माझा आक्षेप नाही जिथे - जिथे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. विशेष करून एम वॉर्ड, विक्रोळी, एस वॉर्ड, इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे निकाल आल्यानंतर सगळे विषय कोर्टात जाणार आहेत. यामध्ये सिध्द झाले तर अधिकार्यांच्या नोकर्या जाणार आहेत हेही नवाब मलिक यांनी आवर्जून सांगितले.
मुंबईत आम्ही काही ठिकाणी भाजपविरोधात तर काही ठिकाणी शिंदे सेनेसोबत तर काही ठिकाणी कॉंग्रेस विरोधात लढत आहोत. वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळी परिस्थिती आहे. आम्ही एका पक्षाच्या विरोधात आहे असे नाही तर आम्ही आमचा उमेदवार जिंकण्यासाठी लढतो आहोत त्यामुळे प्रतिस्पर्धी कोण असेल हे लवकरच समजेल हे सांगतानाच भाजपच्या काही जागा आम्ही जिंकतोय असा स्पष्ट दावाही नवाब मलिक यांनी केला.
गुन्हेगार आणि शिक्षा होणे हे दोन वेगळे विषय आहेत. पण एखाद्याला शिक्षा झाली तर तो निवडणूक लढवू शकत नाही. शिक्षा झाल्याशिवाय कुणालाही निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही असेही नवाब मलिक पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले.