शिंदे सेनेचा मास्टरस्ट्रोक.... राज्यभरात तब्बल एवढे नगरसेवक बिनविरोध...

Share:
Main Image
Last updated: 02-Jan-2026

ठाणे, (प्रतिनिधी) २ जानेवारी - मुंबईचे लुटारू तुम्ही आहात आणि तिचे रखवालदार आम्ही आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. निवडणुका आल्या की काहींना अचानक मुंबई आणि मराठी माणसाची आठवण येते. मात्र त्यांनी आजवर मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी नेमके काय केले, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असे आव्हान शिंदे यांनी दिले.

मुंबईतील मराठी माणूस तुमच्याच कारभारामुळे मुंबईबाहेर फेकला गेला असून, त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. भावनिक मुद्द्यांच्या आधारे मुंबईकर आणि मराठी माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले की, निवडणुकीपुरते मराठी प्रेम दाखवण्यापेक्षा विकासाची कामे समोर ठेवावीत. मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाण्यास कोण जबाबदार आहे, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत विरोधकांकडून केली जाणारी टीका ही निंदनीय असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, भावनिक आवाहन करून मुंबईकर आणि मराठी माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे केवळ निवडणुकीपुरते राजकारण आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे यांनी सांगितले की, शिवसेना–भाजप महायुतीचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, ही विजयाची नांदी आहे. ठाणेकरांनी विजयाची सुरुवात केली आहे. त्या सर्व नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन केले. येत्या 15 तारखेला ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, याबाबत कुठलीही शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कल्याण–डोंबिवली, जळगाव आदी ठिकाणीही महायुतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी नमूद केले. बिनविरोध निवड ही कामाची पोचपावती असते. ज्या ठिकाणी विरोधकांना पराभवाची खात्री असते, तेथे ते माघार घेतात आणि बिनविरोध निवड होते, असे शिंदे म्हणाले.

मुंबईच्या विकासावर बोलताना त्यांनी विरोधकांना सवाल केला की, तुम्ही एक तरी ठोस विकासकाम दाखवा. आम्ही खड्डेमुक्त रस्ते, काँक्रीट रस्ते, मेट्रो प्रकल्प सुरू केले, कोस्टल रोड पूर्ण केला. बंद पडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले. मुंबईला ग्लोबल फिनटेक हब बनवण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्राला मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी–गुजराती असा वाद निर्माण करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करत शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच असे राजकारण केले नाही. विकासाचे राजकारण करा, भावनिक मुद्द्यांवरून लोकांची दिशाभूल करू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला राहील आणि 16 तारखेला राज्यभर महायुतीचा भगवा फडकेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे राज्यभरात १९ उमेदवार बिनविरोध 

ठाणे महानगरपालिकेतील बिनविरोध उमेदवार

१)  सुखदा मोरे 
२) जयश्री फाटक 
३) जयश्री डेव्हिड 
४) सुलेखा चव्हाण 
५) शीतल ढमाले 
६) एकता भोईर 
७) राम रेपाळे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका बिनविरोध उमेदवार

१)  रमेश म्हात्रे 
२) वृषाली जोशी
३) विश्वनाथ राणे 
४) हर्षल मोरे
५) ज्योती मराठे 
६) रेश्मा नीचळ 

जळगाव महानगरपालिका बिनविरोध उमेदवार

१) मनोज चौधरी 
२) प्रतिभा देशमुख 
३) सागर सोनावणे 
४) गौरव सोनावणे 
५) रेखा पाटील
६) गणेश सोनावणे

Comments

No comments yet.