नाशिक, (प्रतिनिधी) २ जानेवारी - नाशिकमधील चोरट्यांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही, असे दिसते आहे. दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि दररोज होणाऱ्या चोऱ्या यातून हेच समोर येते आहे. या चोऱ्यांमुळे सध्या शहरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने काहीतरी कारवाई करण्याची मागणी होते आहे.
बसमध्ये चढणाऱ्या महिलेची पर्स केली लंपास
नाशिक - बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना ठक्कर बाजार बसस्थानक आवारात घडली. यात तीन हजाराच्या सोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ५८ हजार रूपये किमतीचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित अशोक वाघमारे (रा. शिवााजीनगर, दिंडोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघमारे दाम्पत्य बुधवारी (दि.३०) शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते परतीच्या प्रवासासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेले असता ही घटना घडली. कळवण नाशिक बसमध्ये चढत असतांना चोरट्यांनी वाघमारे यांच्या पत्नीच्या पर्समधील रोकडसह सुमारे १ लाख ५८ हजाराच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तपास हवालदार मुर्तडक करत आहेत.
गळ्यातून मंगळसूत्र हिसकावले
नाशिक - रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेले. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एकत्रित जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनिता मनोज चौधरी (रा.शिवकॉलनी पांडवनगरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी गुरुवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. वडाळा पाथर्डी रोडने त्या पाथर्डी गावाच्या दिशेने पायी जात असतांना वर्दळीच्या गुरू गोविंद सिंग कॉलेज समोर दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील पेंडल असलेले सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दुसरी घटना याच मार्गावरील हंबा शॉप समोर घडली. या घटनेत संध्या दत्तात्रेय घेनंद (रा.पांडवनगरी) यांच्याही गळ्यातील सुमारे ६५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र भामट्यांनी खेचून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस दप्तरी एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पगारे करीत आहेत.
नाशिक - उघड्या घरात शिरून चोरट्यांनी रोकडसह दागिन्यावर डल्ला मारला. ही घटना पाथर्डी शिवारातील नरहरीनगर भागात घडली असून यात सुमारे १ लाख ५ हजार रूपये किमतीच्या अलंकार चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदिश दरोगा पंडीत (रा. शिवम रो हाऊस,नरहरीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पंडीत कुटुंबीय बुधवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास आपल्या कामात व्यस्त असताना घरात शिरून चोरट्यांनी ही चोरी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड, सोन्याचा हार असा सुमारे एक लाख ५ हजार ५०० रूपये किमीचा ऐवज चोरून नेला. तपास हवालदार पवार करीत आहेत.
नाशिक - नाशिक - पुणा मार्गावरील शिवाजीनगर भागातील घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४३ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह चारचाकी वाहनाच्या चावीचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवंत जगन्नाथ कातोरे (रा. शिवपुजन रो हाऊस सहकार कॉलनी, शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कातोरे कुटूंबिय गेल्या सोमवारी (दि.२९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ४१ हजार ५०० रूपयांची रोकड व चारचाकी वाहनाची चावी असा सुमारे ४२ हजार ५०० रूपये कितीचा ऐवज चोरून नेला असून तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.