राज्यपालांनी चक्क तिफनवर केली ज्वारीची पेरणी... खोरीपाडाचे आदिवासी शेतकरी सम्राट राऊत यांचे शेत ठरले आकर्षण...

Share:
Main Image
Last updated: 02-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ जानेवारी - दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील आदर्श शेतकरी सम्राट राऊत यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस होता.  राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांना सुखद धक्का दिला. एवढेच नव्हे तर तिफनवर ज्वारीची पेरणी करून शेती आणि शेतकरी यांच्याविषयी असलेल्या आत्मीयतेचे दर्शन घडविले. 

इतरही शेतकऱ्यांशी शेतीविषयी चर्चा करतांना त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. राज्यपालांच्या भेटीने शेतकऱ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.  नाशिक जिल्हा दौऱ्यात ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रेमाने व आदरातिथ्याने भारावून गेल्याची भावना देवव्रत यांनी व्यक्त केली. 

आपण स्वतः शेतकरी असून अनेक देशी गायी असल्याने संपूर्णपणे नैसर्गिक शेती करतो आणि ती लाभदायी असल्याने शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राऊत कुटुंबानेदेखील नैसर्गिक शेतीत पिकविलेल्या वस्तूंची अनोखी भेट देऊन राज्यपाल देवव्रत यांचा सत्कार केला. राज्यपालांची ही भेट स्मरणीय करण्यासाठी पावरी हे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य त्यांना भेट देण्यात आले.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद आदी उपस्थित होते.

राऊत कुटुंबियांचे खास आदरातिथ्य

राऊत कुटुंबाने खास ग्रामीण चवीची नागलीची पेज, तांदळाचे धिरडे तयार करून राज्यपालांचे आत्मीयतेने आदरातिथ्य केले. देवव्रत यांनी या पदार्थांचा आनंदाने आस्वाद घेत ते आवडल्याची पावतीही दिली. कौटुंबिक स्नेहाचा परिचय देत त्यांनी कुटुंबातील सदस्यांची प्रेमाने विचारपूस केली. त्यांनी जनावरांच्या गोठ्याची पाहणी आणि  शेताच्या बांधावर वृक्षारोपणही केले. तसेच पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या स्टॉलला भेट दिली. पारंपारिक आदिवासी संस्कृतीनुसार राज्यपाल महोदयांचे करण्यात आलेले औक्षण आणि स्वागताचा देवव्रत यांनी मोकळेपणाने केलेला स्वीकार उपस्थित शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अनुभव होता.

राज्यपालांनी राऊत यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे केलेले कौतुकही कुटुंबातील सदस्यांना सुखावून गेले. यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet.