विनापरवानगी पिस्तुल घेऊन फिरणे पडले महागात...

Share:
Last updated: 02-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ जानेवारी - विनापरवानगी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पांडवलेणी भागात ही कारवाई करण्यात आली असून, संशयिताच्या ताब्यातून पिस्तूलसह जीवंत काडतुसे असा सुमारे ३८ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल राजन सिंग (१९ रा.ज्ञानपिठ सोसा. पांडवलेणी) असे अटक करण्यात आलेल्या पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पांडवलेणी परिसरातील गरवारे हाऊस भागात फिरणाऱ्या तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३१) पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. 
त्याच्या अंगझडतीत तीन जिवंत काडतुसांनी भरलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार अमोल कोथमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

नाशकातील घरफोड्या थांबेनात

नाशिक - अमरधामरोडवरील गणेशवाडी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याच्या पोतीचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शकुंतला बाळकृष्ण शेळके (रा.साईबाबा मंदिराजवळ,शेरेमळा गणेशवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेळके कुटूंबिय गेल्या मंगळवारी (दि.३०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाात ठेवलेली दोन हजार रूपयांची रोकड व सोन्याची पोत असा ७२ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तपास हवालदार सोर करीत आहेत.

Comments

No comments yet.