नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २ जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात लठ्ठपणाशी लढण्याचे आणि तेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या या आवाहनाला डॉक्टर, खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील लोकांचा मोठा पाठिंबा लाभला आहे.
डेहराडून इथे सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी देशात लठ्ठपणाची समस्या कशी झपाट्याने वाढत आहे यावर चर्चा केली होती. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याकारणाने ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना फिट इंडिया चळवळीविषयी देखील सांगितले होते. आपल्या संबोधनात त्यांनी संतुलित आहार आणि व्यायामावर भर देत त्याचे महत्वही सांगितले. अन्नातील अनारोग्यकारक चरबी आणि मेदयुक्त घटक कमी करण्याचे महत्त्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले होते, आणि आपल्या दैनंदिन सेवनात तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याची अभिनव सूचनाही केली होती.
अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधानांनी दिलेल्या या संदेशाची प्रशंसा केली असून चांगल्या आरोग्याचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनाला आरोग्य क्षेत्राने मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला आहे. नियमित शारीरिक व्यायाम आणि संतुलित पौष्टिक आहारासाठी पंतप्रधानांनी केलेले आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाने अधोरेखित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी योग्य वेळी लठ्ठपणा आणि संबंधित जोखीम कमी करण्याचे महत्त्व अधोरेखीत करणारा संदेश दिला असल्याची प्रतिक्रिया पी. डी. हिंदुजा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना यांनी व्यक्त केली आहे.
महाजन इमेजिंग अँड लॅब्सचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. हर्ष महाजन यांनी देखील लठ्ठपणाविरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची प्रशंसा केली आहे.
लठ्ठपणा हे एक गंभीर आव्हान असून, याविरोधात एक देश म्हणून आपल्याला तातडीचा आणि एकत्रितपणे लढा द्यावा लागेल असे उजाला सिग्नस हेल्थकेअर सर्व्हिसेसचे संस्थापक संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी म्हटले आहे.
इतर अनेक डॉक्टरांनी देखील लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
भारतीय दंतवैद्यक संघटना, टाटा मेमोरियल रुग्णालय, एंडोक्राइन सोसायटी ऑफ दिल्ली यांच्यासह अनेक रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि संघटनांनीही लठ्ठपणाविरोधातील या चळवळीला पाठिंबा दर्शवला आहे.
अनेक खेळाडूंनीही पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पद असल्याची भावना मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग याने व्यक्त केली आहे.
फिटनेस प्रशिक्षक मिकी मेहता आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्यपदक विजेता मुष्टीयोद्धा गौरव बिधूरी यांनी देखील पंतप्रधानांच्या या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.