अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २ जानेवारी - जिल्ह्यात मुलींची घटती संख्या हा चिंतेचा विषय झाला असून, गर्भात असलेल्या चिमुकलीला वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी ग्रामसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशाताई, ए.एन.एम. आणि शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे. ग्रामसमितीच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.
'स्त्री जन्माचे स्वागत करा' चळवळीच्या आद्यप्रवर्तक तसेच पी.सी.पी.एन.डी.टी. स्टेट ॲडव्हायझरी बोर्डच्या सदस्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या संकल्पनेतून ११ कलमी कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. यात मुख्यत्वे दि. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींची संख्या दर्शविणारा बोर्ड लावणे, लोकसहभागातून 'कन्याजन्म आनंद सोहळयासाठी १० रुपयांची जादू' योजना, गर्भवती मातांना गर्भरक्षण व गर्भसंस्काराचे धडे देणारी (ए.एन.सी. ट्रॅकिंग) मैत्री योजना, त्यासाठी सामुदायिक डोहाळे जेवणाचे नियोजन, फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान, 'नकोशी'सारख्या नकारात्मक नाव असणाऱ्या मुलींचे पुनर्नामकरण करणारी 'नकोशीला करूया हवीशी' योजना, विवाह सोहळ्यात 'आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा', 'सोनोग्राफी मशीन: शाप की वरदान ?' माहिती तसेच सामूहिक शपथेचा समावेश आहे.
डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आतापर्यंत अहिल्यानगर, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, नेवासा आणि पारनेर तालुक्यातून कार्यशाळा संपन्न झाल्या आहेत. प्रत्येक कार्यशाळेत डॉ. सुधा कांकरिया लिखित 'स्त्री जन्माचे स्वागत करा' या पुस्तकाच्या प्रती प्रत्येक तालुक्यात जनजागृती व लोकशिक्षणासाठी भेट म्हणून देण्यात आल्या. यात ९ नाटिका, अनेक कविता, कायदा व ११ कलमी कृती कार्यक्रमाचा समावेश आहे. तसेच ११ कलमी कृती कार्यक्रमाच्या हस्तपत्रिका वितरीत करण्यात आल्या.
'मुलगीच आहे पणती, दोन्ही घरी उजेड देते', या उक्तीप्रमाणे समाजात मुलींचे महत्त्व मोठे आहे. तरीही अनेकदा कुटुंबात मुलाचा जन्म झाला नाही तर आईला दोषी ठरविले जाते, तिला त्रास दिला जातो. परंतु मुलगा किंवा मुलगी जन्मणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असते. हे वैज्ञानिक सत्य शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याविषयीचे चिंतनही या कार्यशाळांच्या माध्यमातून करण्यात आले.
जिल्हा विधी सल्लागार ॲड. सारिका सुराशे यांनी पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा व कायद्याचे सोप्या शब्दांत स्पष्टीकरण केले. तसेच 'खबरी योजनेबाबत' सविस्तरपणे विचार मांडले. यावेळी १८००-२३३-४४७५ व १०४ हेल्पलाईन या टोलफ्री क्रमांकाची आणि http://amchimulgimaha.in या संकेतस्थळाची माहिती देण्यात आली.