बिल्डिंगवरून पडल्याने महिलेचा मृत्यू...

Share:
Last updated: 01-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ जानेवारी - उंचावरून तोल जाऊन पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना कमोदनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्वाती दीपक पवार (रा. तिसरा मजला गोदावरी अपा.कमोदनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. स्वाती पवार या बुधवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीत उंचावरून पडल्याने जखमी झाल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने पती दीपक पवार यांनी त्यांना तातडीने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचारापुर्वी डॉ. राजीव केला यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत डॉ. संदीप सोमवंशी यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास जमादार माळी करीत आहेत.

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

नाशिक - गंगापूर रोडवरील मल्हारखान झोपडपट्टीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रणाली आनंद अहिरे असे मृत मुलीचे नाव आहे. प्रणाली अहिरे हिने बुधवारी (दि.३१) सायंकाळी अज्ञात कारणातून राहत्या घरात लाकडी बांबूला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. हे लक्षात येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. तपास उपनिरीक्षक नाईक करत आहेत.

Comments

No comments yet.