मुंबई, (प्रतिनिधी) १ जानेवारी - भारताने लोकशाही पद्धती स्वीकारल्यानंतर १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. लोकशाही पद्धतीचे संरक्षण आणि प्रत्येक मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदारांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य असून जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्देश जारी केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगामार्फत १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीत्या बजावता यावा, यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी व कामगार, जरी ते कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी, त्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे.
हा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, हॉटेल्स, खाद्यगृहे, मॉल्स, रिटेल आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, रुग्णालये व दवाखाने यांना लागू राहणार आहेत. अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे संबंधित नियोक्त्यांना बंधनकारक राहील असे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे १० डिसेंबर २०२५ रोजीचे शासन परिपत्रक यासंदर्भात लागू असून, सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कामगार आयुक्त यांनी केले आहे.