बापरे! जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर... एवढी आहे संख्या...

Share:
Main Image
Last updated: 01-Jan-2026

जळगाव, (प्रतिनिधी) १ जानेवारी - जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक, वस्तुनिष्ठ व धोरणात्मक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक संपन्न झाली.

या सर्वेक्षणामध्ये विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार, दिव्यांग तसेच विविध कारणांनी एकट्या राहणाऱ्या महिलांची अचूक संख्या, त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता आदी बाबींची सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार आहे. संकलित माहितीनुसार गरजाधारित व परिणामकारक उपाययोजना राबविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हे सर्वेक्षण बिनखर्चिक, समन्वयित व प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO), समाजकार्य (MSW) महाविद्यालये तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्वेक्षणाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांची वयोगटनिहाय व सामाजिक घटकानुसार माहिती संकलित करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये विधवा महिलांची संख्या सर्वाधिक १ लाख ९ हजार ९८१ इतकी असून, घटस्फोटीत ३ हजार ४१३, परित्यक्ता अथवा माहेरी दिलेली ४ हजार ५९, निराधार व आजारग्रस्त १ हजार ४६५, कुटुंबापासून वेगळ्या राहणाऱ्या १ हजार ३३६, अविवाहित (30 वर्षांपेक्षा जास्त) १ हजार ६७४, तर इतर कारणांमुळे एकट्या राहणाऱ्या १३५ महिला असल्याची नोंद आहे.

वयोगटानुसार पाहता ३० ते ४४ वयोगटात १९ हजार ९५, ४५ ते ५९ वयोगटात ३७ हजार २३१ तर ६० वर्षांवरील  वयोगटात ६३ हजार १६४ महिला असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार जामनेर (१५,१६२), रावेर (१२,१९५) व पाचोरा (७,८१५), चाळीसगाव (१११९२) तालुक्यांत एकल महिलांची संख्या तुलनेने अधिक असून, अमळनेर, पारोळा, चोपडा, यावल, भडगाव, एरंडोल, धरणगाव, मुक्ताईनगर, बोदवड , जळगाव, भुसावळ,  तालुक्यांतही लक्षणीय संख्येने एकल महिला आढळून आल्या आहेत. बैठकीदरम्यान सर्वेक्षणाची कार्यपद्धती, विभागनिहाय जबाबदाऱ्या, क्षेत्रनिहाय समन्वय, माहिती संकलन व विश्लेषणाबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. एकल महिलांचे सक्षमीकरण हे केवळ सामाजिक नव्हे तर प्रशासकीय प्राधान्य असून, प्रत्येक पात्र महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.

या बैठकीस  अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ,जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जि. प. जळगाव तहसिलदार संगायो, अ-वर्ग न. पा. क्षेत्र,  तहसिलदार संगायो, सह आयुक्त, नगरविकास शाखा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हास्तरीय समन्वयक, NULM / City Mission Manager, जळगाव शहर महानगरपालिका, मूळजी जेठा महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य विभाग प्रमुख विभाग, विद्यार्थी कल्याण समिती व NSSचे संचालक उपस्थित होते.

Comments

No comments yet.