नववर्षारंभी येवला नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कौतुकास्पद निर्णय... पदग्रहण करताच हे कार्य...

Share:
Main Image
Last updated: 01-Jan-2026

येवला, (प्रतिनिधी) १ जानेवारी २०२५ - येवला नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा गुरुवार, दि.१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता येवला नगरपालिकेत पार पडणार आहे. या पदग्रहण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून नगराध्यक्ष व नगसेवक नव्या कारकिर्दीची औपचारिक सुरुवात करणार आहे. या सोहळ्यानंतर लगेचच संपूर्ण येवला शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे,ज्येष्ठ नेते अरुण मामा थोरात, संभाजी पवार,  येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भाजप नेते प्रमोद सस्कर,बंडू क्षीरसागर,महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान,  भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री आनंद शिंदे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते राजेश भांडगे,दत्ता निकम, सनी पटनी, भाजप नेते धनंजय कुलकर्णी, सुभाष पाटोळे, मनोज दिवटे, भाजप युवा जिल्हाध्यक्ष समीर समदडीया, शहराध्यक्ष मीनानाथ पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

या पदग्रहण सोहळ्याची सुरुवात येवला शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून करण्यात येणार आहे. समता,स्वाभिमान,राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर आधारित कारभार करण्याचा संकल्प नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यावेळी करणार आहे.   

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह १५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येवला शहरात विकासाची दिशा ठरवली जात असून येवला शहराच्या भविष्याचा विचार करून दिलेल्या वचननाम्याची पूर्ती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
तसेच येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेने केंद्रस्थानी जनता असलेली धोरणे राबविली जाणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप मित्रपक्षांच्या वतीने वचननाम्यात स्वच्छ सुंदर येवला असा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार पदग्रहन सोहळा संपन्न होताच संपूर्ण येवला शहरात एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व घनकचरा जेसीबी, ट्रॅक्टर, डम्परच्या सहायाने घनकचरा प्रकल्पात हलविण्यात येऊन येवला स्वच्छ सुंदर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, भाजप मित्रपक्ष युतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,आजी माजी नगरसेवक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. हा पदग्रहण सोहळा म्हणजे येवला शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.ो

Comments

No comments yet.