या गावच्या विशेष ग्रामसभेला थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची उपस्थिती... चर्चा तर होणारच...

Share:
Main Image
Last updated: 01-Jan-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १ जानेवारी - केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आयोजित ‘विशेष ग्रामसभे’ला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र शासनाच्या वतीने प्रस्तावित असलेल्या 'विकसित भारत – जी राम जी' (VB-GRAM G) या विधेयकावर चर्चा करण्यासाठी नववर्षाच्या प्रारंभी, अर्थात गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामविकासाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर चौहान हे ग्रामसभेला संबोधित करतील. 'विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन - ग्रामीण' अंतर्गत जुन्या मनरेगाच्या १०० दिवसांऐवजी आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १२५ दिवस रोजगाराची हमी व पेरणी-कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळावेत, यासाठी शासकीय कामात ६० दिवसांच्या 'हंगामी विरामाची' (Seasonal Pause) तरतूद, यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर या सभेत विचारमंथन होणार आहे. 

या ऐतिहासिक ग्रामसभेच्या नियोजनाचा आढावा राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विशेष ग्रामसभेचे कामकाज व मान्यवरांचे मार्गदर्शन समाजमाध्यमाद्वारे  थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

Comments

No comments yet.