नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 31-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर - माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे मका,रागीसह भरड धान्य आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येवल्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नुकत्याच दोन खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या वर्षी मकासह धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील अधिक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मका व धानासाठी योग्य दर मिळावा यासाठी शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे केली होती. या मागणी नंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मुदतवाढ देण्यास मागणी केली होती. 

त्या अनुषंगाने खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्य नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी नोंदणीस देण्यात आलेल्या  मुदतवाढ कालावधीत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन शेतकऱ्यांच्या नोंदणीची कार्यवाही करावी,असे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सूचित केले आहे.

खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान व मका,ज्वारी,रागीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडूनच शासनामार्फत आधारभूत किंमतीने धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अधिकाधिक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.