मुंबई, (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला हव्या असणाऱ्या महत्त्वाच्या जागा भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आपल्या कोट्यातून रिपब्लिकन पक्षासाठी सोडणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिलेले आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील काही जागाही रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पक्षाने 17 जागांची अंतिम यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सोपवली. त्यातील किमान 12 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येतील. अन्य जागांवर रिपब्लिकन पक्षाची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तसेच मुंबई मनपाच्या उर्वरित 197 जागांवर रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटकपक्ष म्हणून महायुती उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्षा बंगल्याबाहेर पत्रकारांना दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, युवक आघाडी अध्यक्ष पपू कागदे, एम.एस. नंदा, हेमंत रणपिसे सचिन मोहिते, आदी अनेक मान्यंवर उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देण्यात आली नसल्यामुळे रिपब्लिकन पक्ष नाराज होता. या नाराजीतून रिपब्लिकन पक्षाच्या 30 उमेदवारांनी स्वबळावर मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. 30 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर निवडणुक लढत आहेत. त्यातील 17 जागांची अंतिम यादी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली. त्यातील भाजपच्या कोट्यातील 6 ते 7 जागा सोडण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दिली असून तसे निर्देश त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना दिले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातूनही रिपब्लिकन पक्षाला हव्या असणाऱ्या 6-7 जागा सोडण्यात येणार आहेत. त्याविषयी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे. उर्वरित 18 जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. भाजप - शिवसेना कोट्यातून 6-6 अशा 12 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येतील. त्या 12 जागांवरील भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील.
रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना महायुतीचा पाठिंबा राहील. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे 12 उमेदवार निवडणुक लढतील. उर्वरित उमेदवार हे रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर निवडणुक लढतील. 30 जागांच्या व्यतिरीक्त मुंबईतल्या सर्व 197 जागांवर रिपब्लिकन पक्ष भाजप-शिवसेना महायुतीचा प्रचार करेल आणि त्यांना पाठिंबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विविध मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केले. रिपब्लिकन पक्षाला 2 विधानपरिषद सदस्य, 60 महामंडळाचे सदस्य, तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 स्वीकृत सदस्य देण्यात यावेत अशी मागणी रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर रिपब्लिकन पक्षाचे समाधान झाले असून पक्षाची नाराजी दूर झालेली आहे.