नाशिक, (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर - एमआयडीसी कार्यालयात तक्रारी देऊन उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या संतोष शर्मा याच्यावर आता दहावा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांच्या टोळक्याने एका कारखानदाराकडे तीन लाखाची मागणी करीत ६० हजार रूपयांची खंडणी वसूल केल्याचे पुढे आले असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष शर्मा (रा.देवळाली कॅम्प), शशीभाऊ राजपूत, रोहितभाऊ म्हस्के आणि कैलास दवंडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत आशिष सोमनाथ शिनकर (रा.खुटवडनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी कार्यालयाशी संधान साधत खंडणी उकळणारी शर्मा गँग गेल्या महिनाभरापासून चर्चेत आली आहे. महितीच्या अधिकाराचा गैरवापर करून या गँगने बहुतांश उद्योजकांना ब्लॅकमेल केल्याचे पुढे आले आहे. अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात आजपर्यंत दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिनकर यांचा इन्फिनीटी एन्टरप्राईजेस नावाचा कारखाना आहे. गेल्या जानेवारी महिन्यात संशयितांनी या कंपनीविरोधात एमआयडीसी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. उद्योजक शिनकर यांनी दाद न दिल्याने संशयितांनी कंपनीच्या गेटवर जाऊन विनापरवाना अनधिकृत तिक्रमण हटाव, एमआयडीसी बचाव असे पोस्टर चिकटवले होते.
तसेच कामगारांमध्ये दहशत निर्माण करत तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तुमच्या मालकाने तक्रार मागे घेण्यासाठी पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामळे भेदरलेल्या शिनकर यांनी ६० हजार रुपये संशयितांना दिल्याचे तक्रारीत नमूद केले असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.