..तर होणार थेट अडीच लाखांचा दंड... जिल्हाधिकारी आक्रमक...

Share:
Main Image
Last updated: 31-Dec-2025

नंदुरबार, (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या सर्रास वापरामुळे होणाऱ्या गंभीर अपघात, जखमा आणि मृत्यूच्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री पूर्णतः प्रतिबंधित केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रस्तावित दंडात्मक कारवाई:

अल्पवयीन व्यक्ती: अल्पवयीन व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्यांच्या पालकांना न्यायालयात रुपये 50 हजार जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत, अशी विचारणा केली आहे. 
प्रौढ व्यक्ती: प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, संबंधित व्यक्तीला न्यायालयात रुपये 50 हजार रक्कम जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत, अशी विचारणा केली आहे. 
विक्रेते/साठादार: नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा करताना आढळल्यास, प्रत्येक वेळी रुपये 02 लाख 50 हजार रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत, अशी विचारणा केली आहे.

सुनावणीची पुढील तारीख:

या प्रस्तावित कारवाईविरोधात कोणास हरकत किंवा म्हणणे मांडायचे असल्यास, त्यांनी पुढील सुनावणीच्या दिवशी, म्हणजेच 05 जानेवारी, 2026 रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे. जर कोणीही न्यायालयात हजर राहून हरकत मांडली नाही, तर सार्वजनिकरित्या या दंडात्मक कारवाईस कोणाचीही हरकत नाही, असे गृहीत धरले जाईल.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही सार्वजनिक सूचना दिली असून, नायलॉन मांजाचा वापर किंवा विक्री केल्यास संबंधित व्यक्ती कायदेशीर व आर्थिक परिणामांना पूर्णतः जबाबदार राहील, असे स्पष्ट केले आहे .

Comments

No comments yet.