नाशिक, (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर - दुसऱ्याच्या नावे असलेला प्लॉट भामट्यांनी परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्र आणि तोतया दाम्पत्यास उभे करून खरेदी विक्रीचा हा व्यवहार पार पडला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश रमेश संसारे (रा. वडगाव पंगू ता.जि.नाशिक), अनोळखी महिला आणि पुरुष, भीमराव कोंडीबा वाघमारे, मुकेश जाधव, रविंद्र हरिदास अडांगळे, शरद भास्कर मुठेकर व अॅड. कपिल पाठक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संतोष संजीबा हेगडे (६७ रा. महात्मानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
हेगडे दाम्पत्याच्या नावे पाथर्डी शिवारातील चेतनानगर भागात भूखंड आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात संशयितांनी हेगडे दाम्पत्याची परवानगी न घेता सदर प्लॉटची खरेदी विक्री व्यवहार केला. बनावट कागदपत्र व तोतया महिला आणि पुरूष उभे करून ही खरेदी झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.