नाशिक शहरात आणखी तिघांची आत्महत्या...

Share:
Last updated: 31-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर - शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यातील दोघांनी गळफास लावून घेत तर एकाने विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविले. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत अंबड,भद्रकाली व इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

अंबड औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात राहणाऱ्या सेलीम रिम्या गावीत (२३ रा.मनपा शाळेसमोर कारगिल चौक) या युवकाने रविवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या घरातच किचनमधील पंख्याच्या लोखंडी हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला. पुतण्या उत्तेश गावीत याने तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार झोले करीत आहेत. दुसरा प्रकार गंजमाळ भागात घडला. 

सुनील काशिनाथ घोडे (२३ रा.सहकारनगर भिमवाडी) या युवकाने सोमवारी (दि.२९) दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या लाकडी बल्लीस दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत मामा नितीन कांबळे यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यालाही तपासून मृत घोषित केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रेहरे करीत आहेत. 

तर लहानू पुंजाराम गायकवाड (२४ रा. गौळाणेरोड पाथर्डी शिवार) या युवकाने १६ डिसेंबर रोजी सायंकाळी अज्ञात कारणातून राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले. सोमवारी (दि.२९) उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉ. तुषार पाटील यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.

भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक - स्वयंपाक करत असताना भाजलेल्या ६९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना देवळाली गावात घडली. या घटनेत वृध्दा गंभीर भाजली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नर्गीस गणी शेख (रा.अलिबाबा तबेलाजवळ देवळाली गाव) असे मृत महिलेचे नाव आहे. नर्गीस शेख या शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास आपल्या घरात स्वयंपाक करत असताना ही घटना घडली. स्वयंपाक करताना कपड्यांनी अचानक पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. 
मुलगी नाजनीन पठाण यांनी त्यांना तातडीने बिटको हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी उपचार सुरू असतांना डॉ. सौरभ भोयर यांनी त्याना तपासून मृत घोषित केले. तपास हवालदार गोसावी करीत आहेत.

Comments

No comments yet.