नाशिककरांनो पाणी जपून वापरा! मुख्य जलवाहिनीला गळती

Share:
Last updated: 30-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सातपूर विभागांतर्गत येणाऱ्या मुख्य कच्च्या पाण्याच्या जलवाहिनीला (Raw Water Pipeline) मोठी गळती लागल्याने आज शहराच्या मोठ्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. मुक्त विद्यापीठ गेटजवळ १२०० मिमी व्यासाच्या या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे विभाग:

जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे आज, मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी खालील विभागांचा दुपारचा आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील:

 * नाशिक पूर्व
 * नाशिक पश्चिम
 * पंचवटी
 * नाशिक रोड
 * सातपूर (काही भाग)

उद्या पाणीपुरवठा कमी दाबाने

दुरुस्तीचे काम मोठे असल्याने ते पूर्ण होण्यास साधारण ८ ते १० तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने स्पष्ट केले आहे.

मनपाचे आवाहन

गळतीचे स्वरूप गंभीर असल्याने तातडीची बाब म्हणून हे काम हाती घेणे अनिवार्य होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते, त्याबद्दल पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरी नाशिककर नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.