नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - पोलिसात तक्रार दिल्याच्या वादातून तरुणावर दोघांनी चाकू हल्ला केल्याची घटना गोदाघाटावर घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा लासूरे व त्याचा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. याबाबत दीपक शांताराम धुमाळ (रा.कमलनगर, हिरावाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे. धुमाळ व लासुरे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद हातापायीवर गेल्याने धुमाळ याने लासुरे विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली होती. या रागातून ही घटना घडली. धुमाळ रविवारी (दि.२८) रात्री गोदाघाटावर गेला होता. समाधी मंदिर परिसरात दोघांनी त्यास गाठून पोलीसात का तक्रार केली याबाबत जाब विचारत संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत चाकू हल्ला केला. या घटनेत पोटात चाकू खुपसण्यात आल्याने धुमाळ जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.