नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - प्रेमप्रकरणाची माहिती महिलेच्या पतीस दिल्याचा जाब विचारल्याने दोघांनी रिक्षाचालकाचा निर्घृण खून केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २९) पहाटे साडेचार वाजता खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ दोन संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार अर्जुन गायकवाड (२५) व मोईन कासम सय्यद (२४ दोघे रा. नागसेननगर वडाळानाका) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत गणेश श्याम सकट (२० रा.नागसेननगर वडाळानाका) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत सुमित सुखारन राखपसरे (वय २८, रा. अवधूतवाडी) या रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली. रविवारी (दि. २८) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास द्वारका येथील एका धार्मिक स्थळाजवळ हा प्रकार घडला.
फिर्यादी गणेश सकट याचा मावस भाऊ सुमित राखपसरे याचे परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या प्रेम प्रकरणाची माहिती संशयितांनी सदर महिलेच्या पतीस दिली होती. त्यामुळे सुमित राखपसरे व संशयितांमध्ये वाद होता. राखपसरे हा रविवारी रात्री आपल्या मावसभावास भेटण्याठी रिक्षा घेऊन परिसरातील गोदावरी हॉटेल भागात आला होती. अचानक या ठिकाणी तिघांची भेट झाल्याने ही घटना घडली. सुमितने दोघांना प्रेमप्रकरणाची वाच्यता का केली याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात वाद झाला. यावेळी संशयित मोईन सय्यद याने बळजबरीने रिक्षाची चावी काढून घेतली तर ओमकार गायकवाड याने कमरेला लावलेला धारदार कोयता काढून रिक्षाचालक सुमित राखपसरे याच्यावर हल्ला केला.
बेसावध सुमितच्या पोटात लोखंडी कोयता खुपसण्यात आल्याने त्याने बचावाचा प्रयत्न केला. मात्र संतप्त दुकलीने त्यास रस्त्यावर खाली पाडून पुन्हा पाठीवर सपासप वार केले. यावेळी झालेल्या आरडाओरड मुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता संशयितांनी काढता पाय घेत पोबारा केला. सुमित यास तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणात आणखी कोणी संशयित आहेत का, यासंदर्भात मुंबई नाका पोलीस तपास करत आहेत.