नाशकात होणार गोदा जन्मोत्सव... असे असतील भव्य कार्यक्रम...

Share:
Main Image
Last updated: 30-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदा जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाच्या वर्षी कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांचा गोदा राष्ट्रजीवन पुरस्काराने होणार सन्मान होणार आहे. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता रामतीर्थावर केंद्रीय सांस्कृतिक कार्य व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी दिली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गोदा राष्ट्रजीवन गौरव २०२६ पुरस्काराबाबत व महाआरती आणि आयोजित माहिती देण्यासाठी सोमवारी इस्कॉन मंदिर द्वारका,नाशिक येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी उपाध्यक्ष भक्तिचरन दास महाराज, नरसिंहकृपा प्रभू, सचिव मुकुंद खोचे, धनंजय बेळे, शैलेश देवी, चिराग पाटील, दीपक भगत, डॉ.अंजली वेखंडे, आशिमा केला, शिवाजी बोंदारडे, वैभव क्षेमकल्याणी, नरेंद्र कुलकर्णी, कल्पेश लोया, आशुतोष केला, विनीत पिंगळे, चैतन्य गायधनी, अक्षय शेरताटे, राजेंद्र फड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गोदावरी ही केवळ एक नदी नसून ती भारतीय संस्कृतीची जीवनवाहिनी, अध्यात्माची प्रेरणास्थळी, पर्यावरणीय संवेदनशीलतेचे प्रतीक आणि सामाजिक समरसतेचा अखंड प्रवाह आहे. हजारो वर्षांपासून भारतीय समाजजीवन घडविणाऱ्या या पवित्र नदीच्या तटावरून समाजाला एकात्मतेचा, बंधुत्वाचा व सांस्कृतिक मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचा संदेश देणे, हाच या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

“जातिपाती विरल्या, मने समरस झाली, समाजशक्ती एकवटली, गोदाभक्ती उजळली” या मूलविचारावर आधारित हा महोत्सव समाजातील भेद विसरून सर्व घटकांना एका सूत्रात बांधणारा असून, राष्ट्रीय जीवनात अध्यात्म, संस्कृती आणि समरसतेचे महत्व अधोरेखित करणारा आहे.

या महोत्सवात पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्त्वाला समर्पित जीवनकार्य करणारे, भारतीय शेती, माती आणि शाश्वत विकास यासाठी आयुष्य वाहिलेले थोर कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांना गोदा राष्ट्रजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा क्षण नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमाला शांताकुमारी (प्रमुख संचालिका – राष्ट्र सेविका समिती) यांचे मार्गदर्शन लाभणार असून, विजया रहाटकर (अध्यक्षा – राष्ट्रीय महिला आयोग) यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. तसेच पूज्य गौरांग प्रभूजी (प्रमुख मार्गदर्शक – इस्कॉन) यांचे आशीर्वाद या महोत्सवाला लाभणार आहेत.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून ११११ महिलांची भव्य गोदा महाआरती आयोजित करण्यात येत आहे. या महाआरतीत परिचारिका, डॉक्टर, वैद्य, अभियंता, पोलीस खात्यातील महिला, महिला वकील, कामगार वर्गातील महिला वनवासी क्षेत्रातील युवती  यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मातृशक्तीचा सहभाग असणार आहे. तसेच विविध जाती, संस्था, संघटना व सामाजिक घटकांतील महिलांचा सहभाग हे या महाआरतीचे वैशिष्ट्य असून, समरसतेचे जिवंत चित्र या माध्यमातून समाजासमोर उभे राहणार आहे.

ही गोदा महाआरती नाशिक शहरातील आजवरची अत्यंत भव्य,व्यापक आणि सर्वसमावेशक महिला सहभाग असलेली आरती ठरणार असून, नाशिक शहराच्या सर्व भागांतून मोठ्या संख्येने महिला या पवित्र उपक्रमात सहभागी होतील, असा समितीचा संकल्प आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, नाशिक शहरातील विविध भागांमध्ये महिलांसाठी गोदा महाआरतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण वर्ग केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित नसून, त्यातून शिस्त, संस्कार, सामूहिकता आणि सांस्कृतिक जाणिवेचे संस्कार घडवले जात आहेत.

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव आध्यात्म, राष्ट्रजीवन,पर्यावरण आणि सामाजिक समरसता यांचा सुंदर संगम ठरणार असून, नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात एक नवा, प्रेरणादायी अध्याय जोडणारा ठरेल, असा विश्वास या पत्रकार परिषदेत संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.

Comments

No comments yet.