नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - जीवघेण्या नॉयलॉन मांजा खरेदी विक्रीसह तो बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून शनिवारी (दि.२७) सिन्नरफाटा भागात एकास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईत पाच हजार रूपये किमतीचे गट्टू हस्तगत करण्यात आले. बंदी घालण्यात आलेला मांजा संशयिताने कोठून व कोणाकडून खरेदी केला याबाबत कबुली दिली आहे. पोलीस पसार विक्रेत्याचा शोध घेत असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रेश गोविंद पाटील (३७ रा.मराठा कॉलनी सिन्नरफाटा) असे मुद्देमालासह अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्यास मांजाचा पुरवठा करणारा स्वौम्य भुकटीयार या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत अंमलदार विशाल कुवर यांनी फिर्याद दिली आहे. सिन्नरफाटा येथील सिटी लिंक बस डेपो भागात एक तरूण बंदी घालण्यात आलेल्या नॉयलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पोलिसांनी धाव घेत चंद्रेश पाटील या संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून पाच हजार रूपये किमतीचे दहा गट्टू हस्तगत करण्यात आले असून पोलीस तपासात त्याने भुकटीयार याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सानप करत आहेत.
यापूर्वी देखील २२ डिसेंबर रोजी अशीच कारवाई करत शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने जुने नाशिक मधील चव्हाटा भागात एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत २४ हजार रुपयांचे २४ गट्टू हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिम मोहम्मद इकबाल शेख (४० रा. नाईकवाडीपुरा जुने नाशिक ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नॉयलॉन मांजा विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत युनिट १ चे हवालदार संदिप भांड यांनी फिर्याद दिली आहे. जुने नाशकात मोठ्या प्रमाणात नॉयलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री पथक मांजा विक्रेत्यांचा माग काढत असताना मस्जीद भागात संशयित अजमेरीकडे मांजाचे गट्टू असलेली पिशवी आढळली. त्याच्या ताब्यातून २४ गट्टू हस्तगत करण्यात आले असून मुद्देमालासह त्यास भद्रकाली पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार सोळसे करत आहेत.