नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - भरधाव दुचाकी घसरल्याने एका ५० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात हिरावाडी ते अमृतधाम मार्गावर झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकास पोपटराव चव्हाण (रा.अभिजीतनगर हिरावाडी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. चव्हाण गेल्या १९ नोव्हेंबर रोजी अमृतधाम भागात गेले होते. दुपारच्या सुमारास ते घराकडे परतत असताना हा अपघात झाला. अमृतधामकडून ते हिरावाडीच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करत असताना वरद विनायक गणपती मंदिरासमोर भरधाव दुचाकी घसरली. या घटनेत चव्हाण रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांचे भाऊ योगेश चव्हाण यांनी त्यांना तातडीने नजीकच्या लोकमान्य रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले होते. रविवारी (दि.२८) उपचार सुरू असतांना डॉ. स्पर्श लोंढे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाचा अधिक तपस तपास भोये करत आहेत.
नाशिक - शेकोटीत तोल जाऊन पडल्याने २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील पाईपलाईन रोड भागात घडली. या घटनेत सदर युवक गंभीर भाजला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उमेश महेंद्र सिंग यादव (रा.मयान हॉटेल, मोतीवाला कॉलेजजवळ) असे मृत युवकाचे नाव आहे. उमेश यादव गेल्या गुरूवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास आपल्या घर परिसरात शेकोटी पेटवत असताना ही घटना घडली होती. तोल जाऊन पेटत्या शेकोटीवर पडल्याने तो गंभीर भाजला होता. या घटनेत त्याच्या छाती, पोट व दोन्ही पाय भाजल्याने त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.२८) उपचार सुरू असतांना डॉ. सौरभ भोयर यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. तपास हवालदार लोंढे करीत आहेत.