नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - नाशिक येथे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सोमवारी उत्साहात पार पडला. विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाशी आपली निष्ठा व्यक्त केली. या पक्ष प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले, असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. या वेळी गणेश मोरे, प्रेम पाटील, दशरथ पाटील आणि करण गायकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. ना. दादाजी भुसे यांनी सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी दादा भुसे म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिवसैनिकाने संघटन मजबूत करणे, जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि विकासकामांच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. एकजूट, शिस्त आणि लोकहिताच्या कामांच्या जोरावर शिवसेना येणाऱ्या निवडणुकांत निश्चितच भक्कम यश मिळवेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे वरिष्ठ नेते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.