नाशिक, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - शहर आणि परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी पावणे सात लाख रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी इंदिरानगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वडाळा पाथर्डी रोडवरील अमोल कुंजीलाल ठाकरे (रा.एकलव्य अपा.पांडवनगरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाकरे कुटुंबीय २६ ते २८ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड चोरून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार तळपाडे करीत आहेत. दुसरी घरफोडी एकलहरा रोड भागात घडली. नितीन चंद्रभान पवार (रा.वृंदावनग कॉलनी अस्वलेमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबीय शनिवारी (दि.२७) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली सुमारे पाच लाख २८ हजार ३०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत.
पोलीस म्हणून आले... हिऱ्याची अंगठी घेऊन पळाले...
नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी ६५ वर्षीय वृध्दाच्या हातातील खडा असलेली सोन्याची अंगठी हातोहात लांबविली. ही घटना जायभावे मळा भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर नरहरी शिरसाठ (६५ रा. सेवनस्टार अपा.सराफनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिरसाठ रविवारी (दि.२८) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. वडाळा पाथर्डी मार्गावरील जायभावे मळा भागातून ते रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्याची वाट अडविली. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी शिरसाठ यांना हातातील अंगठी काढून ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी मदतीचा बहाणा करून खडा असलेली सुमारे ३२ हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी हातोहात लांबविली असून तपास हवालदार पवार करीत आहेत.