येवला नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी - भारतीय जनता पार्टी महायुतीच्या गटनेतेपदी यांची सर्वानुमते निवड

Share:
Main Image
Last updated: 29-Dec-2025

येवला, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - येवला नगरपरिषदेत नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) कॉंग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी महायुतीचा गटनेता म्हणून दीपक शिवाजीराव लोणारी यांची एकमताने निवड करण्यात आली. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व सदस्यांनी एकमताने दीपक लोणारी यांची निवड केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गटाची नोंदणी करत नगरपालिकेच्या कारभाराविषयी मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला नगरपालिकेत महायुतीला १४ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ज्येष्ठ सदस्य छाया क्षीरसागर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्य प्रवीण बनकर यांनी सदस्य दिपक लोणारी यांची गटनेते पदासाठी सूचना मांडली. त्यानंतर सदस्य जयाबाई जाधव अनुमोदन करत सर्वानुमते दिपक लोणारी यांच्या नावाला अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) कॉंग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या एकत्र गटाची गटनोंदणी केली. 

या निवडीनंतर भुजबळ फार्म येथील कार्यालयात मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी सर्व सदस्यांशी संवाद साधत गटनेते पदी निवड झाल्याबद्दल दीपक लोणारी यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्वांनी एकदिलाने काम करावे तसेच येवला शहरातील नागरिकांना महायुतीच्या वतीने दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी कामाला लागावे असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सर्व नगरसेवकांना शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येवला शहराचा भारतात ४१ वा नंबर आहे. येवला नगरपालिकेचा हा नंबर पहिल्या दहा मध्ये यायला हवा या दृष्टीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र भाऊलाल लोणारी, नगरसेवक शेख परवीन बानो, जयाबाई जाधव, जावेद मोमीन, लक्ष्मीबाई  जावळे, प्रविण  बनकर, छाया क्षिरसागर, पारूल गुजराथी, महेश काबरा, कुणाल परदेशी, लक्ष्मी  साबळे, शंकर मांजरे, पुष्पा गायकवाड, चैताली शिंदे या नगरसेवकांसह पदाधिकारी उपाध्यक्ष दत्ता निकम, राजेंद्र भांडगे, भाजप नेते बंडू क्षीरसागर, निसार लिंबूवाले, सचिन शिंदे, गुड्डू जावळे, सुनील जाधव, यती गुजराथी, सचिन साबळे,  भूषण लाघवे, सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet.