नाशकात तीन महिला आमदार असूनही महिला असुरक्षितच....विनयभंगाच्या तब्बल पाच घटना..

Share:
Last updated: 29-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - शहरात विनयभंगाचे प्रमाण वाढले असून परिचितांकडूनच महिला असुरक्षित असल्याचे चित्र आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या पाच महिलांचा विनयभंग करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी, भद्रकाली, इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज दत्ता तलवलकर (रा.कमल टॉवर बिल्डींग, सितागुंफा रोड काळाराम मंदिराजवळ) या संशयिताने शनिवारी (दि.२७) सायंकाळी पीडित विवाहितेस गाठून तिचा विनयभंग केला. माझ्याशी का बोलत नाही असा जाब विचारत संशयिताने हे कृत्य केले. शिवीगाळ आणि मारहाण करीत संशयिताने माझ्याशी बोलली नाही तर पतीस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. 

विनयभंगाचा दुसरा प्रकार गंजमाळ येथील आंबेडकर पुतळा भागात घडला. भीमवाडीतील दोन बहिणी रविवारी (दि.२८) सायंकाळी रस्त्याने पायी जात असतांना नितीन गहिले (रा.भिमवाडी) या संशयिताने त्यांना कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ केली. याबाबत एकीने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. 

तिसरा प्रकार इंदिरानगर भागात घडला. विजय छाजेड आणि त्याच्या मुलाने शनिवारी (दि.२७) रात्री तक्रारदार यांच्या मुलीस मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. बापलेकीस जीवे ठार मारण्याची धमकी देत संशयितांनी हे कृत्य केले असून, आमच्या नादी लागू नकोस, नाही तर वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार शेख करीत आहेत. 

नाशिक - पुणा मार्गावरील बोधलेनगर भागात पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून मेव्हणीचा विनयभंग करण्यात आला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या बहिणीने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या वादातून बहिणीची सासू शोभा कापडणीस व तिचा मुलगा कल्पेश कापडणीस (रा.दोघे साई शिव रो हाऊस,नांदूरनाका) यांनी शनिवारी (दि.२७) रात्री पीडितेचे घर गाठून हे कृत्य केले. पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी या कारणातून संशयितांनी शिवीगाळ करीत आईला मारहाण केली तर कल्पेश कापडणीस याने विनयभंग केल्याची तक्रार आहे. तर नाशिकरोड येथील आर्टीलरी सेंटर भागात आर्थिक देवाण - घेवाणीच्या कारणातून गंगाधर उत्तम श्रीखंडे (रा. जयभवानीरोड) याने महिलेचा विनयभंग केला. पिडीतेचा पती आणि संशयितामध्ये आर्थिक व्यवहार आहे. रविवारी (दि.२८) सकाळी हा प्रकार घडला. पतीने हात उसनवार घेतलेल्या पैशांच्या कारणातून संशयिताने महिलेचे घर गाठून हे कृत्य केले. आर्थिक वाद उकरून काढत संशयिताने शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला. यावेळी त्याने पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास हवालदार हिवाळे व बरेलीकर करीत आहेत.

Comments

No comments yet.