नाशिक, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - आईसमान वयाच्या महिलेने शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेचा खून केल्याची घटना नाशकात समोर आली आहे. या महिलेने संबंधास नकार दिल्याने संशयिताने मद्याच्या नशेत तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि त्र्यंबक पोलिसांनी नाममात्र पुराव्यावरून अवघ्या काही तासात या गुह्याचा उलगडा केला असून संशयितास बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडूरंग देवराम उर्फ गोविंद भगरे (३५, मूळ रा.सामुंडी ता.त्र्यंबकेश्वर हल्ली गुरूद्वाराजवळील मोकळ्या जागी त्र्यंबकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत झुनकाबाई सीताराम वाघ (५२ रा. ब्राम्हणवाडे ता. त्र्यंबकेश्वर) या महिलेचा खून करण्यात आला आहे. बुधवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास नाशिक त्र्यंबकरोडवरील संदीप हॉटेल भागात ४० ते ५० वयोगटातील अनोळखी महिलेचा खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. वरिष्ठांनी या घटनेची दखल घेतल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि त्र्यंबक पोलीस कामाला लागले होते. मृत महिलेचे कपडे आणि वर्णनावरून पथकांनी संशयिताची आई चांगूना देवराम भगरे हिला ताब्यात घेतल्याने या घटनेचा उलगडा झाला. मृत महिलेची ओळख पटवत चांगूना भगरे हिने आपला मुलगा पांडूरंग ही गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितल्याने या खुनाला वाचा फुटली. त्र्यंबक परिसरातून संशयितास हुडकून काढत पथकाने अल्पावधीत या खुनाचा भांडाफोड केला आहे.
मृत महिला, संशयित व त्याची आई भंगार गोळा करून उदरनिर्वाह करायचे. तिघांनाही दारूचे व्यसन होते. झुनकाबाई आणि चांगुना यांच्यात मैत्री झाल्याने ते गुरुद्वारा भागातील मोकळ्या जागेत उघड्यावर एकत्र राहायचे. दिवसभर गोळा केलेले भंगार विक्री करून ते उशिरापर्यंत दारूचे सेवन करायचे. मंगळवारी (दि.२३) नेहमीप्रमाणे मध्यरात्रीपर्यंत तिघांंनीही दारूचे अतिसेवन केले. यावेळी संशयित पांडुरंग भगरे याने मातेसमान झुनकाबाईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने शरीर संबंधास विरोध केल्याने ही घटना घडली. मद्याच्या नशेत असलेल्या संतप्त पांडूरंग भगरे याने जवळच पडलेला वजनी दगड उचलून झुनकाबाईच्या डोक्यात मारून तिचा निर्घृण खून केला. संशयिताने या खुनाची कबुली दिल्याने त्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर,पेठचे उपनिभागीय अधिकारी वासूदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रविंद्र मगर,त्र्यंबकचे निरीक्षक महेश कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक राजेश गावित, नितीन रणदिवे, जमादार नवनाथ सानप,सचिन गवळी, संदिप नागपुरे हवालदार प्रविण काकड, संतोष दोंदे, पोलीस नाईक नवनाथ शिरोळे, त्र्यंबकेश्वरचे अंमलदार सचिन जाधव, शांताराम निंबेकर, सुरेश घायवट, सचिन गांगुर्डे, भारत भावले, अमोल बोराडे, निता ब्राम्हणे, बच्छाव, तांत्रिक विभागाचे हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.