नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राने गेल्या दशकात, विशेषतः गेल्या अकरा वर्षात अभूतपूर्व वाढ अनुभवली असून प्रवासी वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेत मोठी वाढ झाली आहे. या विस्तारामुळे मोठे यश मिळाले असली तरी त्यासोबतच उड्डाण विलंब, परताव्याशी संबंधित तक्रारी, सामान विषयक समस्या, गर्दी, लांबच लांब रांगा आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांसाठी अपुऱ्या सुविधा यांसारखी आव्हानेही निर्माण झाली आहेत. या आव्हानांमुळे प्रवाशांशी संबंधित या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक सुसंघटित, समन्वित आणि रिअल-टाइम प्रतिसाद यंत्रणेची गरज अधोरेखित झाली होती.
या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एक कायमस्वरूपी, 24×7 प्रवासी सहाय्यता नियंत्रण कक्ष (PACR) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. प्रवासी सहाय्यता आणि संकट प्रतिसादासाठी एक एकीकृत, भविष्यवेधी यंत्रणा संस्थात्मकरित्या स्थापित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्रवासी सहाय्यता नियंत्रण कक्ष हा नवी दिल्लीतील उडान भवन येथे एक एकात्मिक केंद्र म्हणून कार्य करतो, अशी माहिती सचिव समीर कुमार सिन्हा यांनी दिली. या केंद्रात नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), विमानसेवा कंपन्यांचे संचालक आणि इतर प्रमुख भागधारक एकाच छताखाली कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले. "PACR चोवीस तास कार्यरत असते, विमान वाहतूक कार्यांवर सतत देखरेख ठेवते, प्रवाशांचे कॉल स्वीकारते तसेच रिअल-टाइम सहाय्यता आणि तक्रार निवारणाचे कार्य अत्यंत कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे करते." असे ही ते म्हणाले.
एअरसेवा प्रणाली देखील PACR मध्ये पूर्णपणे समाकलित करण्यात आली असून त्याद्वारे प्राप्त झालेल्या प्रवाशांच्या तक्रारी सहजपणे हाताळल्या जातात. एक सर्वसमावेशक चॅनल तंत्रज्ञान प्रणाली प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचनांचे कृतीयोग्य प्रकरणांमध्ये रूपांतर करते, यासोबतच डेटा-आधारित डॅशबोर्ड तक्रारींचे प्रकार, वेळापत्रक आणि भागधारकांच्या कृतींची थेट माहिती उपलब्ध करून देतात. नियंत्रण कक्षात विमानसेवा कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे तात्काळ समन्वय साधणे आणि समस्यांचे जागेवरच निराकरण करणे शक्य होते. सचिवांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, 3 डिसेंबर 2025 पासून, PACR येथे केंद्रित देखरेख आणि जलद उपाययोजनांद्वारे आतापर्यंत 13,000 हून अधिक प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, 500 हून अधिक कॉल-आधारित उपाययोजना करून कामकाजातील व्यत्ययादरम्यान प्रवाशांना थेट मदत करण्यात आली आहे. उड्डाण विलंब, रद्दबातल, परतावा आणि सामानाशी संबंधित तक्रारींना प्राधान्य दिले जाते आणि पॅसेंजर चार्टरच्या तरतुदींनुसार त्यांचे निराकरण केले जाते.
PACR ची स्थापना भारताच्या नागरी विमान वाहतूक परिसंस्थेमध्ये प्रवाशाला केंद्रस्थानी ठेवण्याच्या स्पष्ट दृष्टिकोनावर आधारित आहे. हा उपक्रम 'प्रवासी प्रथम', 'सहकार्यात्मक कृती', 'भागधारकांचे एकत्रीकरण' आणि 'भविष्यासाठी सज्ज', तंत्रज्ञान-आधारित चौकट या तत्त्वाद्वारे मार्गदर्शीत असून यामुळे शाश्वत सुधारणेसाठी रिअल-टाइम समन्वय, डेटा-आधारित निर्णय-प्रक्रिया आणि विस्तारक्षम कार्यपद्धती सक्षम होते.
सचिव समीर कुमार सिन्हा दररोज PACR ला वैयक्तिक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतात आणि प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित निवारण सुनिश्चित करतात. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष; डीजीसीएचे सहसंचालक; नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे उपसंचालक आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेतृत्व आणि पाठबळ PACR च्या प्रभावी कार्यप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.
तक्रार निवारणाच्या वेग, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत झालेल्या लक्षणीय सुधारणेला हवाई प्रवासी आणि भागधारक या दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. “नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने समर्पित मनुष्यबळ, वर्धित तांत्रिक सहाय्य आणि सुधारित लॉजिस्टिक सुविधा पुरवून PACR ला आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे, जेणेकरून ही प्रणाली सर्वकाळ सहानुभूती, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वासह प्रवाशांची सेवा करत राहील,” असा विश्वास सचिवांनी व्यक्त केला.