नाशिक, (प्रतिनिधी), दि. २८ डिसेंबर २०२५ - शहर परिसरात सायबर भामट्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. या भामट्यांच्या भूलथापांना अनेक जण बळी पडत आहेत. चार व्यावसायिकांसह खासगी नोकरी करणाऱ्या दोघांना चुना लावण्यात आल्याचे सायबर पोलिस स्टेशनमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या दोन गुन्ह्यात उघड झाले आहे. या घटनांमध्ये वेगवेगळी आमिषे दाखवत भामट्यांनी सात जणांना तब्बल दीड कोटीं रूपयांची फसवणुक केली आहे.
शहरातील काही व्यावसायीकांशी सायबर भामट्यांनी गेल्या महिन्यात संपर्क साधला होता. शेअर मार्केट ट्रेडिंग या नावाखाली नागरिकांना अधिक नफ्याचे आमिष दाखवण्यात आले. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधत, तसेच टेलिग्राम चॅनलद्वारे मार्गदर्शन केल्याचा बनाव रचण्यात आला. प्रारंभी कमी रकमेची गुंतवणूकीत नफा दाखविण्यात आला. त्यामुळे संबधीतांचा विश्वास बसला.
यानंतर मात्र अधिकच्या लोभाचे आमिष दाखवित चार व्यावसायीकांकडून तब्बल ८० लाख १० हजार ६५० रुपये आॅनलाईन पद्धतीने उकळण्यात आले असून त्यांनी नफा काढण्याचा प्रयत्न केला असता टॅक्स, प्रोसेसिंग फीअशा नव्या कारणांची यादी पुढे करत आणखी रकमेची मागणी करण्यात आली. फसवणूकीचा हा प्रकार लक्षात येताच संबधीतांनी पोलीसात धाव घेतली आहे.
दुसऱ्या प्रकरणात, शहरातील खासगी नोकरी करणाºया दोघांना ५९ लाख ९९ हजार ३४४ रूपयांना गंडविण्यात आले आहे. त्यातील एकास शेअर मार्केटींग ट्रेंडिगमध्ये अधिकच्या नफ्याचे आमिष दाखवून तर दुसºयास टेलीग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत एका लिंकच्या माध्यमातून आॅनलाईन ज्वेलरी मार्केटिंग' मध्ये ट्रेंडिग करण्याचे आमिष दाखवून ६ लाख ३१ हजार ३४४ रूपयांना गंडविण्यात आले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.
स्थानबद्धतेची कारवाई
प्रतिबंधात्मक कारवाई करूनही न जुमानणाऱ्या विनोद राजेंद्र वकारे (रा.वाल्मिकनगर,वाघाडी पंचवटी) या दारू तस्करावर अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानबध्दची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांनी या कारवाईवर शिक्कामोर्तब केल्याने संबधीतास नाशिकरोड मध्यवर्तीकारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वाघाडी या बहुचर्चित परिसरातील गावठीचे दारू अड्डे उध्वस्त करण्यात एक्साईज विभागाला सन. २०२४ मध्ये यश आले होते. अ विभाग भरारी पथकाचे तत्कालिन निरीक्षकांनी गावठी तस्कर विनोद वकारे याच्या मुसक्या आवळत थेट महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई केली होती. यानंतर वाघाडीतील दारू व्यवसाय थंडावला असतांनाच कारागृहातून बाहेर आलेल्या वकारे याने राज्य उत्पाद शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून पुन्हा गावठीचे जाळे विस्तारल्याने ही कारवाई करण्यात आली.
वारंवार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करूनही न जुमानणाºया वकारे याच्या विघातक कृत्यास आळा घालण्यासाठी एक्साईज विभागाच्या वतीने एमपीडीए कायद्यान्वये पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने बेकायदा हातभट्टीची दारू विक्री करणाºया विनोद वकारे यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा अधिक्षक संतोष झगडे व उपअधिक्षक अ.सु.तांबोरे आदींच्या मार्गदर्शनाखाली अ विभागाचे निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक द.बा.कोळपे,प्रविण देशमुख,भुषण वाणी सहाय्यक दुय्यम निरीक्षक सोनाली चंद्रमोरे जवा राहूल जगताप, मंदलसिंग जाधव, भालचंद्र वाघ, सुनिल दिघोळे व विरेंद्र वाघ आदींच्या पथकाने केली.