नाशिक, (प्रतिनिधी) २८ डिसेंबर - नाशिक महापालिका निवडणुकीत दिवसेंदिवस पक्षांतराला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय कैलास मुदलियार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे तसेच उद्धव ठाकरे गटातील माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पत्करले आहे. मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. नाशिक येथे शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा व नियुक्ती पत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कैलास मुदलियार यांच्या समवेत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत सहभाग नोंदवला. तसेच उबाठा गटाच्या माजी नगरसेविका सौ. सुमनताई सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षवाढीस बळ दिले. यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देत आगामी काळात जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
सोहळ्यादरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करत, संघटन मजबूत करण्यावर, जनतेशी थेट संपर्क वाढवण्यावर आणि विकासकामांच्या माध्यमातून विश्वास दृढ करण्यावर भर दिला. या कार्यक्रमास शिवसेनेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.