नाशिकमध्ये ६ बांगलादेशी महिलांना अटक... इंदिरानगर परिसरात असा झाला भांडाफोड...

Share:
Last updated: 28-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २८ डिसेंबर - नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. या महिलांकडे बांगलादेशचे राष्ट्रीय ओळखपत्र (NID) तसेच भारत सरकारची बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळून आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

गुप्त माहितीवरून रचला सापळा

२६ डिसेंबर २०२५ रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक परिसरात गस्त घालत असताना, पोलीस उपनिरीक्षक संतोष फंदे यांना कवठेकरवाडी (पांडवलेणी परिसर) येथे काही बांगलादेशी महिला संशयास्पदरीत्या राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सपोनि सुनील अंकोलीकर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पांडवलेणी परिसरात सापळा रचून सहा महिलांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे:
१. शिल्पी मोहम्मद शुकरअली अकथेर (वय २५, ढाका)
२. सौम्या संतोष नायक उर्फ सुलताना खातुन (वय २८, जोशुर)
३. मुनिया खातुन उर्फ पिंकी (वय २९, खुलना)
४. सोन्या कबिरुल मंडल (वय २७, जोशोर)
५. मुक्ता जोलील शेख (वय ३५, नोडाईल)
६. शामोली बेगम (वय ४१, ढाका)

मोबाईलमध्ये सापडले बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे

पोलिसांनी या महिलांच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये 'गव्हर्नमेंट ऑफ पिपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश'चे नॅशनल आयडी कार्ड मिळून आले. धक्कादायक बाब म्हणजे, भारतात राहण्यासाठी त्यांनी बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डचाही वापर केला होता. या महिलांना नाशिकमध्ये आश्रय देणारे बॉबी आणि लकी उर्फ लियाकत हमीद कुरेशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कठोर कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(१), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३(५) सह पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार करत आहेत.

यांनी केली कारवाई

ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सुनील अंकोलीकर, संतोष फुंदे, अमजद पटेल, सागर परदेशी, योगेश जाधव, चंद्रभान पाटील, कासुदे, धनवंता राऊत आणि गीता राहणे यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet.