शिर्डी, (प्रतिनिधी) २७ डिसेंबर - भोजापूर चारीच्या माध्यमातून तळेगाव पाणीपुरवठा योजनेला मदत करण्याबाबत शासन निश्चितच सकारात्मक विचार करेल. मात्र, अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समिती तातडीने विसर्जित करून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा घ्यावा व समितीची नव्याने रचना करावी, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावात सुमारे ४ कोटी ५८ लाख रुपये, तसेच तळेगाव येथे १ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, भीमराज चतर, विठ्ठलराव घोरपडे, निळवंडे गावाच्या सरपंच शशिकला पवार, तळेगावच्या सरपंच उषा दिघे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
तळेगाव पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नाचा उल्लेख करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, वर्षानुवर्षे तीच माणसे पाणीपुरवठा समितीत राहिल्याने समितीच्या कामकाजाची स्पष्ट माहिती कोणालाही मिळत नाही. त्यामुळे समिती विसर्जित करून त्यामध्ये सर्व संबंधित गावांचे ग्रामसेवक समाविष्ट करावेत व दर महिन्याला समितीच्या कामाचा आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
शासन जनतेसाठी काम करीत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने विविध निर्णय घेतले जात आहेत. भोजापूर चारीच्या कामासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, भविष्यात या पाण्याचा तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी कसा उपयोग करता येईल, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच मालदाड पाणीपुरवठा योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १७ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मंजूर झाल्याने मालदाड गाव मुख्य हमरस्त्याशी जोडले गेले आहे. जवळे कडलग येथे चाळीस वर्षे रस्ता नव्हता, म्हणून सिद्धेश कडलगला प्राण गमवावे लागले. काल त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. प्रत्येक समाजघटकाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असून, सौर पथदिवे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले, शासनाने निळवंडे कालव्यावरील रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ९ लाख रुपये, निळवंडे दोन डाव्या कालव्यावरील १० लोखंडी पुलांसाठी १ कोटी १३ लाख रुपये, तळेगाव येथील पाणीपुरवठा तलावासाठी ४ लाख रुपये, तळेगाव चौक सुशोभीकरणासाठी ९ लाख रुपये तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी निधी मंजूर केला आहे.