नाशिक, (प्रतिनिधी) २७ डिसेंबर - अगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील तब्बल 1800 झाडांची कत्तल होणार असल्याचा मुद्दा सध्या जगभर चर्चेत आहे. यावरून सोशल मीडियामध्ये घमासान चर्चा होत आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तपोवनमध्ये भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने पर्यावरण व वृक्षप्रेमी उपस्थित होते. या भेटीनंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आज नाशिकमधील तपोवन येथे भेट देऊन पर्यावरण प्रेमी, स्थानिकांशी संवाद साधला. तसेच 'जागरूक नाशिककर नागरिक' व इतर पर्यावरणप्रेमी संघटना, स्थानिकांनी दिलेले निवेदन स्वीकारले.
तपोवन- ‘green zone’ नष्ट करून तेथे 'yellow zone' उभारण्यास पर्यावरण प्रेमींसोबत स्थानिकांचाही स्पष्ट विरोध आहे. भाजपच्या ह्या कारस्थानाविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येतोय.
विकासाच्या नावाखाली हरित पट्टे नष्ट करायचे आणि बिल्डर काँट्रॅक्टरच्या घशात घालायचे, हा सत्ताधीशांचा डाव आम्ही उधळून लावू!
तसेच तपोवनच्या लढ्यात मी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कायम आपल्यासोबत आहे, असे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी दिले.