नाशिक, (प्रतिनिधी) २७ डिसेंबर - शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे दिवसागणीक अपघात होत असून शुक्रवारी (दि.२७) पतीसमवेत दुचाकीवर प्रवास करणाºया पोलीस पत्नीचा बळी गेला. हा अपघात म्हसरूळ आडगाव लिंक रोड भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संघमित्रा रमेश बैसाणे (४७ रा. लाईन नं.१०, पोलीस मुख्यालय) असे मृत महिलेचे नाव आहे. शहर पोलीस दलात कार्यरत असलेले रमेश बैसाणे हे शुक्रवारी पत्नीस सोबत घेवून आडगाव म्हसरूळ लिंकरोड भागात गेले होते. भामरे सोसायटीत असलेल्या सदनिकेची साफसफाई करून बैसाणे दाम्पत्य सायंकाळच्या सुमारास आपल्या घराकडे डबलसिट परतत असतांना हा अपघात झाला. जगन्नाथ लॉन्स भागात भरधाव दुचाकी खड्यात आदळल्याने संघमित्रा बैसाणे या रस्त्यावर पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांना तातडीने नजीकच्या सिध्दीविनायक हॉस्पिटल मार्फत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार विजय गोसावी करीत आहेत.
गाडीने दिलेल्या धडकेत वृद्धेचा मृत्यू
नाशिक - भरधाव गाडीने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय वृध्द महिला ठार झाली. हा अपघात मध्यवर्ती कारागृह परिसरात झाला. याप्रकरणी कारचालकाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सुनिल माळी (रा.बिडीकामगार नगर,अमृतधाम) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. याबाबत रविंद्र दिनकर जाधव (रा.सुभाषरोड पवारवाडी नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव यांच्या मातोश्री शांताबाई दिनकर जाधव (७४) या गेल्या मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास सेट्रल जेल समोरील रोडने रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. रस्त्याच्या कडेने त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात शांताबाई जाधव यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.