नाशिक, (प्रतिनिधी) २७ डिसेंबर - गुणवत्ता, सर्जनशीलता आणि कार्यतत्परता या वैशिष्ट्यपूर्ण त्रिसूत्रीसाठी देशभर ज्ञात असलेल्या येथील अशोका बिल्डकॉन लिमिटेडला प्रतिष्ठेच्या 'सीआयए वर्ल्ड पुरस्कार' मालिकेत नुकतेच गौरवण्यात आले. रस्ते निर्माण प्रकल्प श्रेणीमध्ये सर्वोत्तम पायाभूत सुविधा पुरवठादार कंपनी म्हणून 'अशोका'च्या शिरपेचात हा मनाचा तुरा खोवण्यात आला.
ख्यातनाम एपिक मिडियातर्फे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईस्थित नेहरू सेंटर यथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोका बिल्डकॉन लिमिटेडच्या वतीने सहयोगी उपाध्यक्ष सुभेंदू बोस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अशोका बिल्डकॉनने गेल्या अडीच दशकांत देश-विदेशांत गुणवत्तापूर्ण रस्ते प्रकल्प उभारून लौकिक प्राप्त केला आहे. यापैकी अनेक प्रकल्प निर्धारित वेळेच्या आत उभारून कंपनीने आगळ्यावेगळ्या विक्रमांची नोंद केली आहे. कंपनीच्या याच कामगिरीची नोंद घेत एपिक मिडियाने हा सन्मान केला.
या पुरस्कार प्राप्तीबद्दल अशोका समूहाचे चेअरमन अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख यांनी सुभेंदू बोस आणि टीमचे अभिनंदन केले.