येवलेकरांची होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती... येवला ठरणार महानगरांना जोडणारा केंद्रबिंदू....

Share:
Main Image
Last updated: 27-Dec-2025

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला ठरणार महानगरांना जोडणारा केंद्रबिंदू

९८० कोटी निधी मधून कोपरगांव-येवला-मनमाड-मालेगाव चौपदरी कॉंक्रीट रस्त्याचे काम लागणार मार्गी
 
कोपरगांव-येवला-मनमाड-मालेगाव रस्त्याच्या डी.पी.आरमध्ये येवला शहरात चौपदरी उड्डाणपूल व बाह्य वळण रस्त्याचा समावेश करा

मंत्री छगन भुजबळ यांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता व प्रकल्प संचालकांना सूचना

मालेगाव-मनमाड-येवला-कोपरगाव रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित

येवला, (प्रतिनिधी) दि. २७ डिसेंबर:– कोपरगांव-येवला-मनमाड-मालेगाव चौपदरी रस्ता कॉंक्रीटकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून दि.१९ जून २०२५ रोजी ९८० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कोपरगांव-येवला-मनमाड-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोलची मुदत संपल्याने टोल बंद करण्यात आला असून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या महामार्गाच्या डीपीआरच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या रस्त्याच्या डी.पी.आर मध्ये येवला शहरात चौपदरी उड्डाणपूल व बाह्य वळण रस्त्याचा समावेश करण्यात यावा अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता व प्रकल्प संचालकांना केल्या आहेत.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र व्यवहार करून येवल्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोपरगांव-येवला-मनमाड-मालेगाव चौपदरी कॉंक्रीट रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली होती. तसेच याबाबत माजी खासदार समीर भुजबळ यांनी दि.२१ मे २०२५ रोजी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन येवला शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी येवला बाह्यवळण रस्त्यासह कोपरगांव-येवला-मनमाड चौपदरी कॉँक्रीट रस्ता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोपरगांव-येवला-मनमाड-मालेगाव चौपदरी रस्ता कॉंक्रीटकरणासाठी ९८० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी कोपरगांव-येवला-मनमाड-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोलची मुदत संपल्याने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. 

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यानंतर या रस्त्याचा डीपीआर बनविण्याचे काम सुरु करण्यात आले असून कोपरगांव- येवला-मनमाड-मालेगाव एनएच १६० एच आणि एनएच ७५२ जी या  रस्त्याच्या डी.पी.आर मध्ये येवला शहरात चौपदरी उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्याचा समावेश करून या कामाचा डीपीआर लवकरात लवकर अंतिम करण्यात यावा अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता व प्रकल्प संचालकांना केल्या आहेत.


येवला शहरातून जाणारा सदर रस्ता उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या रस्त्याला येवला शहरात व्यापाऱ्यांचे शॉप आणि बाजारपेठ आहे.येवला शहरात या रस्त्यावर नेहमी ट्राफिक जॅम होवून वाहन चालक आणि प्रवाशांना त्रास होत असतो. शहरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्याना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडण्याची वेळ येते. या ठिकाणी वारंवार अपघात होवून अनेकदा नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे बाभूळगांव -अंगणगांव-पारेगाव मार्गे येवला शहर बायपास रस्त्याची मागणी आहे.  
भारत सरकार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दि.१९ जून २०२५ च्या अधिसूचनेनुसार एनएच १६० एच व एनएच ७५२ जी मधील कोपरगाव ते मालेगाव ७६ किमी चौपदरी कॉँक्रीट रोडसाठी ९८० कोटी निधी मंजूर केलेला आहे. त्यानुसार या रस्त्यामध्ये येवला शहरात चौपदरी उड्डाणपूल आणि भूसंपादनासह बाह्यवळण रस्त्याचा DPR मध्ये समावेश करून लवकरात लवकर या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम  करण्यात यावा अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत. 


या रस्त्यामुळे येवलेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्ती होणार असून येवला हे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मालेगाव अशा विविध महानगरांना जोडणारा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Comments

No comments yet.