मुंबई, (प्रतिनिधी) २७ डिसेंबर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये युतीची चर्चा सुरू असल्याने काँग्रेसने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही, असं जाहीर केलं. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी अजित पवार यांची भूमिका आहे. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागावाटपाबाबत कोणताही वाद नाही. पण दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकाच चिन्हावर निवडणूक लढवतील, असा अजित पवार यांचा प्रस्ताव आहे.
आजच्या बैठकीत अजितदादांच्या गटाने शरद पवार गटाला पुण्यात केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. या ३५ जागांवरही उमेदवारांनी अजित पवारांच्या 'घड्याळ' या चिन्हावरच निवडणूक लढवावी, अशी अट घालण्यात आली. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व पणाला लावणारा हा प्रस्ताव शरद पवार गटाला पूर्णपणे अमान्य होता. त्यामुळे ही युती होणे अशक्य असल्याचे स्पष्ट होताच, शरद पवार गटाच्या नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर युती फिसकटली आणि शरद पवार गटाने वेळ न दवडता महाविकास आघाडीच्या बैठकीकडे धाव घेतली. आता अजितदादा एकाकी पडले आहेत.