लासलगाव, (प्रतिनिधी) २६ डिसेंबर - येथील वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राचा ४४ वा वर्धापन दिन आणि कै. माधुरी बकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वनस्थळीच्या ३० महिला शिक्षिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून कर्करोग तपासणी करण्यात आली,
शास्त्रीनगर येथील केंद्रात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्धापन दिन कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंतनू पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वैष्णवी पाटील, पिंपळगाव नजिकचे सरपंच ॲड. तुकाराम जाधव, अनिता गंधे,प्रा. शिरीष गंधे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिता गंधे यांनी लासलगाव केंद्राच्या २७ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, या उद्देशाने रोटेरियन नितीन बकरे यांच्या सहकार्याने हे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. काकासाहेब तासकर, डॉ. कल्पना जगताप आणि डॉ. स्मिता तासकर यांनी उपस्थित महिलांना कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी परिसरात सुमारे २००० झाडे लावून त्यांचे संवर्धन करणाऱ्या 'हरित सेने'चा विशेष सत्कार रोटेरियन नितीन बकरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कीर्तनातून समाजप्रबोधन करणाऱ्या संगीता गुंजाळ, स्केटिंगमध्ये यश मिळवणारी दुर्गा गुंजाळ, फरीदा काजी, चैताली वाघ, उषाताई पवार आणि राईसा शाह यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नितीन बकरे म्हणाले की, "कै. माधुरी बकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी काहीतरी ठोस कार्य करावे, या विचारातून हे कर्करोग तपासणी शिबीर आयोजित केले आहे. ग्रामीण भागातील महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र वेळेत तपासणी केल्यास मोठे आजार टाळता येतात. वनस्थळी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले हे सेवाकार्य कौतुकास्पद आहे."
अनिता गंधे यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले की, निर्मलाताईंनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून संस्था महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कटिबद्ध आहे. या कार्यक्रमास सुरेश पवार, प्रा.शिरीष गंधे,राजाबाबा होळकर,शेखर शिंदे,कल्पना परब, वर्मा,रुपा केदारे,मनोज जैन,सुनील पोळ,गणेश महाले, प्रतिभा राऊत, ऋषिकेश जोशीसह वनस्थळी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्थळीच्या सर्व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.