जबरदस्त... या जिल्ह्यात शासकीय सेवा चक्क घरपोच... नागरिकांना द्यावी लागणार अपॉईंटमेंट...

Share:
Main Image
Last updated: 26-Dec-2025

जळगाव, (प्रतिनिधी) २६ डिसेंबर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आता थेट घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अभिनव उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घेता येणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच शासकीय कामासाठी प्रत्यक्ष आपले सरकार सेवा केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या किंवा अर्ज प्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देणे हा आहे.

‘सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत नागरिकांनी https://sewadootjalgaon.in या पोर्टलवर आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्यानंतर संबंधित भागातील आपले सरकार सेवा केंद्रातील केंद्रचालक (सेवादूत) नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार त्यांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अर्ज भरून देणार आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित सेवादूतामार्फत आवश्यक प्रमाणपत्रे नागरिकांना घरपोच वितरित केली जाणार आहेत.

या सेवेमध्ये महसूल विभागातील उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला आदी प्रमाणपत्रांसह इतर विभागांतील सेवा देखील घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सध्या या योजनेअंतर्गत १६० नागरिकांनी घरपोच सेवेचा लाभ घेतला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरपोच सेवेसाठी संबंधित आपले सरकार सेवा केंद्रचालक (सेवादूत) यांना नागरिकांनी अतिरिक्त १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ‘सेवादूत प्रकल्पा’चा लाभ घेऊन शासकीय सेवांचा सोपा, सुलभ व पारदर्शक अनुभव घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  रोहन घुगे यांनी केले आहे.

Comments

No comments yet.