नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - आठ एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी (पाणबुडीविरोधी, उथळ पाण्यात कार्यरत लढाऊ जहाज) पैकी ‘अंजदीप’ हे तिसरे, स्वदेशी पद्धतीने संरचित आणि कोलकात्याच्या गार्डन रिच जहाजबांधणी आणि अभियंते (जीआरएसई) कंपनीद्वारे निर्मित जहाज आज 22 डिसेंबर 2025 रोजी चेन्नई येथे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.
सरकारी-खासगी भागीदारी अंतर्गत जीआरएसई आणि कत्तुपल्ली येथील एल अँड टी शिपयार्ड यांच्याद्वारे संयुक्तपणे भारतीय नौवहन रजिस्टर (आयआरएस) मधील वर्गीकरण नियमांनुसार एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजांची रचना आणि बांधणी आहे.
वॉटरजेट्सद्वारे चालवली जाणारी अंदाजे 77 मीटर लांबीची ही जहाजे, भारतीय नौदलातील सर्वात भव्य लढाऊ जहाजे असून, पाण्याखालील धोक्यांचा परिणामकारक शोध आणि मारा शक्य करण्याच्या दृष्टीने या जहाजांमध्ये अत्याधुनिक हलक्या वजनाचे टॉर्पेडोज, स्वदेशी तंत्रज्ञानाने संरचित पाणबुडी-विरोधी रॉकेट्स आणि उथळ पाण्यात चालणारी सोनार यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे जहाज नौदलाच्या पाणबुडीविरोधी क्षमता, तटवर्ती देखरेख अधिक मजबूत करेल.
हे जहाज म्हणजे आयएनएस अंजदीप या 2003 मध्ये सेवा समाप्ती करण्यात आलेल्या पेट्या वर्गातील जहाजाचे पुनरुज्जीवित रूप आहे. भारताच्या विशाल सागरी क्षेत्राच्या संरक्षणाची बांधिलकी अधोरेखित करत, कर्नाटकमधील कारवारच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या अंजदीप या बेटाच्या नावावरून या जहाजाचे नामकरण करण्यात आले.
अंजदीप हा केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला पुढे नेत, 80%हून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करत, भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीविषयक प्रयत्नांच्या मार्गातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे जहाज देशांतर्गत संरक्षण उत्पादन परिसंस्थेचा विकास आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा दाखलाच आहे.