बिबट्या दिसताच वाजणार सायरन....अशी आहे ही अनोखी यंत्रणा

Share:
Main Image
Last updated: 25-Dec-2025

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे वनविभागातर्फे ‘एआय वाईल्ड नेत्र’  ही सौरउर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बिबट्याचा वावर लक्षात येताच गावकऱ्यांना तात्काळ सावध करणे शक्य होणार आहे.

वनपरिक्षेत्र कार्यालय, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या मौजे कामरगाव येथे २३ डिसेंबर रोजी ही यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेत ‘ऍडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन’ व ‘डीप लर्निंग’ या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. बिबट या वन्यप्राण्याचा डेटाबेस या उपकरणात जतन करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्यास ही यंत्रणा तात्काळ ॲक्टिव्हेट होऊन सायरनद्वारे नागरिकांना धोक्याचा इशारा देते. यामुळे नागरिकांना सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना करणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय काम करते.

बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागास तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली कामरगाव येथील मुरलीनगर व खंडोबा मंदिर परिसरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.

या प्रणालीमुळे केवळ सायरन वाजत नाही, तर बिबट्यांच्या वर्तवणुकीचा अचूक डेटाही वनविभागाला उपलब्ध होणार आहे. बिबट-मानव संघर्ष व्यवस्थापनात ही ‘एआय’ आधारित यंत्रणा अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्वास श्री.सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet.