काय सांगता! नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून चक्क ट्रकच पळवून नेला..

Share:
Last updated: 25-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - बेकायदा गौणखनिज वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आलेला मालट्रक पळवून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिह्याच्या मुख्यालयातून वाळूने भरलेला ट्रक पळविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात ट्रक मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
ट्रक मालक मोहनीश उर्फ पप्पू ठोंबरे व अज्ञात चालक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत जितेंद्र क्षिरसागर (रा.स्नेहनगर,म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. महसूल विभागाच्या पथकाने बेकायदा गौणखणीजाची वाहतूक करणाऱ्या माल ट्रकवर कारवाई केली होती. वाळूने भरलेल्या ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात येवून तो जिल्हाधिकारी कार्यालय आवारात करण्यात आला होता. मात्र शनिवार (दि.२०) व रविवार (दि.२१) च्या सुट्टीची संधी साधत भामट्यांनी तो पळवून नेला. सुरक्षा यंत्रणेस छेद देत ट्रक मालकासह चालकाने वाळूने भरलेला मालट्रक पळवून नेला असून हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने महसूल विभागाच्या वतीने पोलीसात धाव घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार साबळे करीत आहेत.

नाशिक शहरात वाहन आणि घरफोडीचे सत्र सुरूच 

नाशिक - शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारतनगर भागात राहणारा जोयेब अली अश्पाक (रा.हुसेन चौक मदरसा जवळ) हा युवक रविवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी गोल्फ क्लब मैदान परिसरात गेला होता. इदगहा मैदान भागातील प्रवेशद्वाराजवळ पार्क केलेली त्याची प्लॅटीना मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना वडाळारोडवरील काझीनगर भागात घडली. शेहजाब शकिल शेख (रा.अलफरा सोसा.काझीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांची दुचाकी गेल्या शनिवारी (दि.२०) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही घटनांंबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे आणि शिंदे करत आहेत. 

तिसरी घटना सिडकोतील लेखानगर भागात घडली. आदित्य अशोक जगताप (रा.आण्णाभाऊ साठे नगर, देवळाली गाव) या तरूणाने याबाबत फिर्याद दिली आहे. जगताप मंगळवारी (दि.२३) लेखानगर भागात गेला होता. लाईफ केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्याची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास जमादार शेख करीत आहेत.

घरफोडीचे सत्र सुरूच 

शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून महामार्गावरील कुरिअर ऑफिससह चोरट्यांनी बंद घर फोडले. या घरफोडींमध्ये भामट्यांनी अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला असून त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना आडगाव शिवारात घडली. हिमांशू विनोद वैद्य (रा.डीजीपीनगर अंबड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वैदय ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस या कुरिअर कंपनीत कार्यरत असून त्यांचे महामार्गावरील बळी मंदिर ते सिध्दीविनायक चौक दरम्यानच्या शुभकल्याण हाईटस या इमारतीत कार्यालय आहे. गेल्या गुरुवारी (दि.१८) रात्री चोरट्यांनी रूख्मीनी लॉन्स समोर असलेल्या कार्यालय फोडून कपाटात ठेवलेली ४७ हजारांची रोकड व डीव्हीआर असा सुमारे ५२ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार बहिरम तपास करत आहेत. दुसरी घरफोडी चुंचाळे शिवारात झाली. आतिश भगवान खरात (रा.माऊली चौक,चुंचाळे शिवार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खरात कुटुंबीय रविवारी (दि.२१) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली १ लाख ६० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ९१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार साळवे करीत आहेत.

मोलकरणीनेच लांबविले दागिने... असा घडला प्रकार

नाशिक - वृद्धेची देखभाल करणाऱ्या मोलकरणीने रोकडसह दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. वृध्देच्या मुलाने याबाबत पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन बाळकृष्ण रोठे (रा.शामतीर्थ अपा.बोधलेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रोठे यांच्या वयोवृध्द मातोश्री परिसरातील शितलधारा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. कुटुंबीयांनी त्यांच्या देखभालीसाठी इंदू सोनवणे नामक महिलेची नेमणूक केली असून या महिलेने १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर दरम्यान वृद्धेच्या असाह्यतेचा फायदा उठवत हातसफाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोठे यांच्या आईच्या घरात काम करणाऱ्या या महिलेने कपाटात ठेवलेले सुमारे एक लाखाचे अलंकार व साडे तीन लाख रूपयांची रोकड लांबविली आहे. बँक खात्यातील रकमा परस्पर स्वतःच्या खात्यात वर्ग केल्याचे आढळल्याने हा प्रकार समोर आला आहे. तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Comments

No comments yet.