महापालिका निवडणुकीसंदर्भात तातडीने दादा भुसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... केली ही मागणी...

Share:
Main Image
Last updated: 25-Dec-2025

मुंबई, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - राज्यातील शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना बीएलओ व इतर निवडणूक विषयक कामातून वगळण्याची आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि एकूणच शालेय गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षणमंत्र्यांनी ही ठाम भूमिका घेतली आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, शिक्षण हक्क अधिकार अधिनियम २००९ (RTE) नुसार शिक्षकांचे मुख्य कर्तव्य हे 'अध्यापन' हेच आहे. मात्र, अलीकडच्या काळात शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर BLO आणि इतर अशैक्षणिक कामांवर जुंपले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग बुडतात आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येतात.

पर्यायी व्यवस्था काय?

शिक्षकांऐवजी ही कामे कोणाला देता येतील, याचा पर्यायही दादा भुसे यांनी सुचवला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचा संदर्भ देत त्यांनी म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोस्टमन, आरोग्य कर्मचारी, आशा ताई, आणि पालिका कर्मचारी अशा विविध विभागातील मनुष्यबळाचा वापर BLO कामांसाठी करता येऊ शकतो. राज्यात हे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शिक्षकांचा वापर तिथे करणे टाळावे, असे त्यांनी नमूद केले आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया:

माझ्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शैक्षणिक गुणवत्ता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. शिक्षकांचे काम वर्गात शिकवणे आहे. निवडणुकीच्या कामांमुळे शिक्षकांचा वेळ जातो आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच निवडणूक विषयक कामांसाठी इतर विभागांमध्ये सक्षम कर्मचारी उपलब्ध आहे. त्यांचा पर्यायी वापर केला जावा. त्यामुळेच शिक्षकांना बीएलओ कामांतून पूर्णपणे मुक्त करून त्यांना सन्मानाने केवळ शिकवू द्यावे, अशी माझी आग्रही भूमिका आहे.

Comments

No comments yet.